breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी चिंचवड शहरात मुसळधार पाऊस, आपत्कालीन यंत्रणा सज्ज

पिंपरी :  आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी अग्निशमन दलासह महापालिकेने मुख्य कार्यालय आणि सर्व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये आपत्कालीन नियंत्रण कक्ष पुर्ण क्षमतेने कार्यान्वित केले असून आपत्कालीन यंत्रणांशी तात्काळ समन्वय साधून परिस्थिती हाताळण्यात येत आहे. आयुक्त शेखर सिंह यांनी सर्व परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले असून सर्व घटनांचा ते आढावा घेत आहेत. आपत्कालीन परिस्थितीने गंभीर स्वरूप धारण केल्यास अशी परिस्थिती हाताळण्यासाठी एनडीआरएफ, बॉम्बे इंजिनीअरिंग ग्रुप, औंध ब्रिगेड यांच्याशी आयुक्त शेखर सिंह यांनी प्रत्यक्ष संपर्क साधला आहे. त्यामुळे या यंत्रणांना देखील सज्ज ठेवण्यात आले आहे. शहरात उद्भवणाऱ्या सर्व परिस्थितींची माहिती मुख्यमंत्री कार्यालय, उपमुख्यमंत्री कार्यालय, पुणे जिल्हा पालकमंत्री तसेच जिल्हाधिकारी कार्यालय यांना वेळोवेळी देण्यात येत असून आवश्यक उपाययोजना करण्यासाठी प्राप्त मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी केली जात आहे.

हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिला असून नागरिकांनी दक्षता बाळगावी आणि आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे असे आवाहन आयुक्त शेखर सिंह यांनी केले आहे. नदीच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता असून नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांनी सतर्क रहावे, असे आवाहनदेखील आयुक्त सिंह यांनी केले आहे. पवना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला नसला तरी पवना धरण क्षेत्रात पडणारा पाऊस लक्षात घेता नदीपात्रातील पाण्यात वाढ होण्याची शक्यता आहे. पर्यायाने पुरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता गृहित धरून नदीकाठच्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्याचे काम क्षेत्रीय पातळीवर सुरू करण्यात आले आहे.

पिंपरी चिंचवड शहर परिसरात मुसळधार पाऊस सुरु असून शहरातील विविध भागात पाणी साचल्याच्या घटना घडत आहेत. त्या ठिकाणी महापालिकेची आपत्कालीन यंत्रणा युध्दपातळीवर काम करीत आहे. नदीकाठी वास्तव्य करणाऱ्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून धोकादायक स्थळांच्या ठिकाणी वास्तव्यास असणाऱ्यांना सुरक्षितस्थळी स्थलांतरीत करण्यात आले असून तेथे भोजनासह आवश्यक सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत, अशी माहिती आयुक्त शेखर सिंह यांनी दिली. सखल भागात साचलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी पाणी उपसा यंत्रणा वाहन पाठवून कार्यवाही करण्यात येत आहे. तसेच ध्वनीक्षेपकाद्वारे नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या जात असल्याची माहितीही आयुक्त सिंह यांनी दिली.

आपत्कालीन घटनेची माहिती मिळताच संबंधित अधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली घटनास्थळी पथक पाठवून परिस्थिती आटोक्यात आणण्याचा कसोशीने प्रयत्न करण्यात येत आहे.

हेही वाचा     –      Positive Initiatives | नैसर्गिक आपत्तीच्या काळात आमदार महेश लांडगे यांची सतर्कता! 

भोसरी येथील पांजरपोळ समोरील पुणे नाशिक महामार्गावर दोन्ही बाजूने पाणी भरुन वाहत असल्याची तक्रार प्राप्त झाली असून त्यामुळे वाहतुक खोळंबल्याची सूचना देखील महापालिका आपत्कालीन कक्षाला प्राप्त झाली आहे. मदर तेरेसा होम परिसरात मेहता हॉस्पिटलजवळ पावसाचे पाणी साठल्याची माहिती प्राप्त झाली आहे. तसेच लांडगेनगर येथे असलेल्या मोकळ्या जागेत इंद्रायणीनगरकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला पाणी साचल्याची सूचना प्राप्त झाली. चिखली घरकुल परिसरात पाणी साचल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर त्याठिकाणी तात्काळ पथक पाठवून तेथे पाणी उपसा यंत्रणा वाहन घटनास्थळी पाठवण्यात आले असून पाण्याचा निचरा करण्याचे काम सुरू आहे. अभिनवनगर जुनी सांगवी येथील कन्नडवस्ती आंबेडकर नगर मधील झोपड्यांमध्ये नदीचे पाणी शिरल्याची माहिती मिळाली. सांगवी, मधुबन सोसायटी परिसरात पाणी शिरले आहे. काही भागात झाडपडीच्या घटना देखील घडल्या आहेत. पुनावळे रस्ता येथील भुयारी मार्ग, मोरवाडी लालटोपीनगर परिसर, औंध रावेत बीआरटी मार्ग आदी ठिकाणी पाणी साचल्याच्या घटना घडल्याची माहिती मिळाली आहे. या सर्व ठिकाणी महापालिकेचे पथक युद्धपातळीवर काम करत आहे. थेरगाव गॅस दाहिनी येथे पाण्याची पातळी वाढल्याने तेथील वीजपुरवठा बंद करण्यात आला आहे.

मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी आपत्कालीन यंत्रणेला दक्ष राहण्याचे आदेश दिले असून अतिरिक्त आयुक्तांवर क्षेत्रीय कार्यालयनिहाय समन्वय ठेवण्याची जबाबदारी सोपवली आहे. यामध्ये अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांच्याकडे क, इ आणि फ क्षेत्रीय कार्यालय, विजयकुमार खोराटे यांच्याकडे ड, ग आणि ह क्षेत्रीय कार्यालय तर चंद्रकांत इंदलकर यांच्याकडे अ आणि ब क्षेत्रीय कार्यालयाशी समन्वय ठेवण्याची जबाबदारी दिली आहे. सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात उद्भवणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीला तात्काळ प्रतिसाद देऊन कार्यवाही करण्याचे निर्देश देखील आयुक्त सिंह यांनी दिले आहेत. पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील सर्व शाळा आज बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

महापालिका मुख्यालयात नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आला असून याठिकाणी अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर, उप आयुक्त विठ्ठल जोशी, निलेश भदाणे, मुख्य आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल, विशेष अधिकारी किरण गायकवाड आदी अधिकाऱ्यांचे पथक शहरातील आपत्कालीन परिस्थितीचा आढावा घेत असून आवश्यक सूचना नियंत्रण कक्षामार्फत संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या जात आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button