ताज्या घडामोडीमुंबई

बिग बॉस ओटीटीचा तिसरा सिझन सोशल मीडियावर खूप चर्चेत

'बिग बॉस ओटीटी 3 बंद करा', शिवसेना महिला आमदाराची आयुक्तांकडे तक्रार

मुंबई : ‘बिग बॉस ओटीटी 3’ या रिॲलिटी शोमध्ये अश्लिलता दाखवली जात असून हा शो तातडीने बंद करावा, अशी मागणी शिवसेना सचिव आणि प्रवक्ता आमदार डॉ. मनिषा कायंदे यांनी मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्याकडे केली आहे. मनिषा कायंदे यांनी आज (22 जुलै) शिवसेना महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांसह मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेतली. यावेळी त्यांनी ‘बिग बॉस ओटीटी 3’च्या 18 जुलै रोजी प्रसारित झालेल्या एपिसोडमध्ये कलाकार कॅमेऱ्यासमोर अतिशय बिभत्स आणि किळसवाणं कृत्य करत असल्याचं पोलीस आयुक्तांच्या निदर्शनात आणून दिलं. याच शोदरम्यान युट्यूबर अरमान मलिक आणि कृतिका मलिक यांनी कौटुंबिक नात्याच्या सर्व सीमा पार करत सामाजिक मूल्ये पायदळी तुडवल्याचीही टीका कायंदे यांनी केली.

“बिग बॉस ओटीटी 3 या शोने सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. लहान मुलंही हा शो पाहतात. युट्यूबर अरमान मलिक जे बोलत आहे, त्याचा परिणाम लोकांच्या मनावर होतो. त्यामुळे हा शो तातडीने बंद करावा. या शोचे निर्माते आणि प्रक्षेपण करणाऱ्या कंपनीच्या सीईओंवर सायबर क्राईमअंतर्गत गुन्हा दाखल करुन कठोर कारवाई करावी. सदर व्हिडिओ विविध सोशल मीडियावर देखील व्हायरल झाला आहे का याची तपासणी करावी. हा गुन्हा ज्या ज्या कायद्याखाली येत असेल ते सर्व आयपीसीचे कलम सदर शोमध्ये भाग घेणाऱ्या लोकांवर आणि शोच्या सीईओवर लावण्यात यावेत,” अशी लेखी मागणी त्यांनी पोलीस आयुक्तांकडे केली. त्याचबरोबर OTT लाही सेन्सॉरच्या कक्षेत आणण्याची मागणी करण्याबाबत केंद्रीय सूचना आणि प्रसारण मंत्र्यांची भेट घेणार असल्याचं कायंदे यांनी म्हटलंय.

‘बिग बॉस ओटीटी’च्या तिसऱ्या सिझनमध्ये युट्यूबर अरमान मलिक त्याच्या दोन्ही पत्नींसोबत स्पर्धक म्हणून सहभागी झाला. यावरून काही सेलिब्रिटींनीही टीका केली होती. अरमानची पहिली पत्नी पायल मलिक ही काही दिवसांपूर्वी बिग बॉसच्या घराबाहेर पडली. त्यानंतर अरमान आणि कृतिका यांचा रोमान्स शोमध्ये पहायला मिळाला. त्यावरून सोशल मीडियावरही बऱ्याच प्रतिक्रिया येत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button