breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्रराजकारण

Ground Report । खासदार अमोल कोल्हे यांनी भर व्यासपीठावर ‘‘टीम-गव्हाणे’’चा केला पाणउतारा!

शिव-शंभूप्रेमामुळे नाही, पवार साहेबांच्या जादुमुळे आलात! : उबाळे, आल्हाट यांच्यासह निष्ठावंतांचे तोंडभरुन कौतूक 

पिंपरी । विशेष प्रतिनिधी 

भोसरी विधानसभा निवडणुकीसाठी तीव्र इच्छुक असलेले माजी नगरसेवक अजित गव्हाणे यांचा पक्षप्रेवश आणि राजकीय महत्त्वाकांक्षा यावर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी चांगलाच पाणउतारा केला. भर सभेत आणि गव्हाणे व्यासपीठावर पहिल्या रांगेत बसलेले असताना अगदी मिष्कील हास्य करीत कोल्हेंनी ‘‘आयारामांबाबत’’ असलेली खदखद बोलून दाखवली.  

पिंपरी-चिंचवडमधील राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून विजयी संकल्प सभा घेण्यात आली. या सभेला पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार श्रीनिवास पाटील, सुप्रिया सुळे, बजरंग सोनवणे, शहराध्यक्ष तुषार कामठे, पिंपरी विधानसभेच्या संभाव्य उमेदवार व माजी नगरसेविका सुलक्षणा शिलवंत धर यांच्यासह हजारो कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर बोलताना डॉ. कोल्हे यांनी धुव्‍वाँधार ‘बॅटिंग’ केली. 

खासदार अमोल कोल्हे म्हणाले की, लोकसभा निवडणुकी वेळी परिस्थिती वेगळी होती. तुषार कामठे, सुलक्षणा शिलवंत, सुनील गव्हाणे, इम्रान शेख अशा निष्ठावंतांनी जीव ओतून मेहनत घेतली. भोसरीमध्ये मात्र, चित्र वेगळे होते. भोसरीत जेव्हा शिवपुत्र संभाजी महानाट्याचे आयोजन केले. त्यावेळी अनेकांना मुख्यप्रवेशद्वारातून सभागृहात येवून बसण्यासाठी अडचण होती. त्यावेळी शंभूराजाच्या प्रेमापोटी तुम्ही कार्यक्रमाला याल, असे वाटले होते. पण, आला नाहीत.  मात्र, आज शरद पवार साहेबांच्या लोकसभेतील जादूमुळे तुम्ही व्यासपीठावर आलात, असा टोला राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी लगावला आहे. 

दरम्यान, उमेदवारीच्या अपेक्षेने अजित गव्हाणे आणि समर्थकांनी ‘तुतारी’ हातात घेतली. त्यामुळे शिवसेना ठाकरे गटात अस्वस्थता असून, निष्ठावंतांमध्ये प्रचंड नाराजी आहे, असे बोलले जाते. त्यातच डॉ. अमोल कोल्हे यांनी जाहीरपणे शिवसेना ठाकरे गटाच्या सुलभा उबाळे आणि धनंजय आल्हाट यांच्यासह निष्ठावान कार्यकर्त्यांचे नाव घेवून कौतूक केले. डॉ. कोल्हे यांचा चाललेला दांडपट्टा आणि निष्ठावंतांना साजेसी भूमिका पाहता अजित गव्हाणे यांच्या तिकीटावर गंडांतर येणार आहे, असे निरीक्षण राजकीय जाणकारांनी नोंदवले आहे. 

गव्हाणेंचा असा झाला ‘करेक्ट कार्यक्रम’…

राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष तुषार कामठे यांना भोसरीत कमी वेळ देता आला. त्यामुळे नेमकं काम कुणी केलं… याबाबत अध्यक्षांचे थोडसं दुर्लक्ष झालं असेल. पण, सुधारणा करुन घेतली पाहिजे, असा दावाही खासदार कोल्हे यांनी केला आहे. वास्तविक, तुषार कामठे यांच्या पुढाकाराने अजित गव्हाणे आणि समर्थक २८ जणांनी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला. सदर प्रवेशाबाबत डॉ. कोल्हे यांची भूमिका नकारात्मक आहे. किंबहुना, पुण्यातील पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात आणि भोसरीत सत्कार सोहळ्याच्या कार्यक्रमातही कोल्हे यांनी ‘आयाराम’ची भूमिका आणि निष्ठावंतांच्या भावना यावर जाहीरपणे भाष्य केले आहे. जाहीर सभेत आणि शरद पवार यांच्या समोर डॉ. कोल्हे यांनी अवघ्या तीन-चार वाक्यात ‘टीम गव्हाणे’ यांचा ‘करेक्ट कार्यक्रम’ केला. या सभेत माजी आमदार विलास लांडे प्रवेश करतील, असा दावा केला जात होता. पण, त्यांनी घेतलेली सावध भूमिका यामुळे त्यात भर पडली. राष्ट्रवादी-भाजपामधील अनेक नगरसेवक प्रवेश करतील किंवा करणार आहेत, अशी यादी समाजमाध्यमांमधून तसेच एका खासगी वृत्तवाहिनीच्या पत्रपंडितांच्या तोंडून सांगितली जात होती.  मात्र, प्रत्यक्षात हाताच्या बोटावर मोजता येतील, इतक्याच महापालिकेसाठी इच्छुक माजी नगरसेवकांनी गव्हाणेंसोबत सभेतील स्टेजवर येणे पसंत केले. परिणामी, गव्हाणे व समर्थकांना घेतलेल्या निर्णय चुकला की काय? असा प्रश्न पडला तरी वावगे ठरणार नाही.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button