breaking-newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपिंपरी / चिंचवडराजकारण

Ground Report । भोसरीत विरोधकांचे काम ना धाम फक्त निवडणुकीपुरता रामराम!

आमदार महेश लांडगे बदनाम करण्यासाठी ‘नॅरेटिव्ह सेट’ करण्याचा प्रयत्न 

पिंपरी । विशेष प्रतिनिधी 

महाराष्ट्राच्या राजकारणात आगामी विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने प्रचंड उलथापालथ सुरू आहे. त्याला पिंपरी-चिंचवड अपवाद ठरण्याचे कारण नाही. शहरातील पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदार संघातील इच्छुकांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. 

पश्चिम महाराष्ट्रात सर्वाधिक चर्चेत असलेले भाजपाचे भोसरीतील विद्यमान आमदार महेश लांडगे यांच्याविरोधात लढण्यासाठी चढाओढ आहे, अशी चित्र उभा करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यासाठी शिवसेना ठाकरे गटाच्या सुलभा उबाळे, अजित पवार गटातून नुकतेच शरद पवार गटात दाखल झालेले माजी नगरसेवक अजित गव्हाणे, भाजपातील माजी नगरसेवक रवि लांडगे, लक्ष्मण सस्ते यांनी मैदानात उतरण्याची तयारी केली आहे. मात्र, भोसरीच्या राजकारणातील ‘पितामह भीष्म’ माजी आमदार विलास लांडे यांचीही छुपी महत्त्वाकांक्षा आहे. 

‘‘प्रलंबित प्रश्न आणि विकासाचे मुद्दे’’ या कसोटीवर महेश लांडगे यांचा ‘स्टाईक रेट’ ९० टक्के असल्यामुळे प्रलंबित प्रश्न कमी आहेत. यामुळे विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या विरोधी उमेदवारांकडे निवडणुकीसाठी ठोस मुद्दा राहिलेला नाही, असे दिसते. 

अजित गव्हाणे, रवि लांडगे, सुलभा उबाळे यांच्यासह विरोधकांनी ठरवून त्याच-त्याच चघळून चोथा झालेल्या विषयांना धरुन भ्रष्टाचार, हुकूमशाही आणि दडपशाही असे वजनदार शब्द वापरुन एका खासगी वृत्तवाहिनीवर  ‘चाय पे चर्चा’ सुरू ठेवली आहे. त्याद्वारे महेश लांडगे यांची ‘इमेज डॅमेज’ करण्याची रणनिती आहे.  त्यांना अडीच वर्षांच्या महाविकास आघाडीच्या सत्ताकाळात शिवसेनेचा मु्ख्यमंत्री आणि राष्ट्रवादीच्या हातात निर्णायक सत्ता असताना महेश लांडगे यांना अडकवण्यासाठी अनेक प्रयत्न झाले. एखाद्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात पुराव्यांअभावी ठोस कारवाई करता आली नाही. त्यामुळे विरोधकांच्या हाती काहीच लागले नाही. 

वास्तविक, अजित गव्हाणे यांचा काँग्रेस, भाजपा, राष्ट्रवादी आणि पुन्हा राष्ट्रवादी शरद पवार गट असा २५ पेक्षा जास्त वर्षांचा राजकीय प्रवास आहे. म्हणजे, गव्हाणे हे महेश लांडगेंपेक्षा राजकारणात ‘सीनिअर’ आहेत. पण, त्यांना आमदार होता आले नाही, हे शल्य आहे. अनेक मानाची पदे असतानाही २५-३० वर्षांत त्यांच्याकडे सांगता येईल, असे एकही ठोस काम नाही किंवा सूचवलेही नाही. इंद्रायणी नदी सुधार, समाविष्ट गावांतील रस्ते, पाणी पुरवठा, कचरा समस्या याबाबत यापूर्वी कोणतेही ‘व्हीजन’ दिसले नाही. आरोप करण्यापेक्षा समस्येवर काय उपाय करता येईल, असे अभ्यासाने सांगताही आले नाही. विशेष म्हणजे, व्यावसायिक उद्देश सोडून आणि ‘सिलेक्टेड’ लोकांचे कार्यक्रम सोडून अन्य ठिकाणी भोसरी मतदार संघातील विकासासाठी किंवा प्रलंबित प्रश्नांसाठी गव्हाणे यांनी पुढाकार घेतल्याचे दिसत नाही. 

अशीच अवस्था सुलभा उबाळे यांच्याबाबत आहे. २००९ पासून आमदारकीसाठी तयारी करणाऱ्या उबाळे यांना २००९ मध्ये लांडे यांच्याकडून, २०१४ ला लांडगे यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला आहे. २०१७ मध्ये नवख्या उत्तम केंदळे यांच्या विरोधात त्यांना महानगरपालिका निवडणूक जिंकता आली नाही. त्यामुळे महेश लांडगे यांच्याबाबत त्यांच्या मनात खदखद आहे. 

माजी नगरसेवक रवि लांडगे यांनी कै. अंकुशराव लांडगे यांच्या राजकीय वारसा सांगतात. ४० वर्षे आम्ही राजकारणात आहोत, असे अभिमानाने बोलतात. पहिल्यांदाच नगरसेवक झालेले असताना स्थायी समिती सभापतीपदी संधी मिळाली नाही. माझ्या ऐवजी नितीन लांडगे यांना संधी दिली, असा आरोप महेश लांडगेंवर करतात. पण, ते २०१७ च्या महानगरपालिका निवडणुकीत बिनविरोध निवडून येण्यात महेश लांडगे यांचासुद्धा वाटा आहे, हे सोयीस्कर विसतात. 

आमदार लांडगे विरोधकांची ‘एकोप्याची स्ट्रॅटजी’…

 आमदार महेश लांडगे यांच्या विरोधामध्ये निवडणूक जिंकण्याची ताकद अजित गव्हाणे यांच्याकडे नाही. त्यामुळे त्यांनी सुलभा उबाळे, रवि लांडगे, विलास लांडे अशी वेगवेगळी टीम तयार केली आहे. वास्तविक, वेगवेगळ्या पक्षाकडून उमेदवारी मागत असले, तरी ही सर्व मंडळी एकच आहेत. आपआपले कार्यकर्ते सांभाळून ठेवण्यासाठी आणि शेवट्या टप्प्यात अजित गव्हाणेंना पाठिंबा देण्यासाठीची ही ‘एकोप्याची स्ट्रॅटजी’ आहे. आमदार लांडगे यांनी आपल्या कार्यकाळात ‘‘पक्ष-गट-तट न पाहाता येईल त्याचे काम करण्याची भूमिका ठेवली’’ त्यामुळे भाजपा आणि ‘नारळ ग्रुप’ सोडून सर्वपक्षीय कार्यकर्त्यांच्या मनातही लांडगे यांच्याप्रति सकारात्मक भावना आहे. त्यामुळे निवडणुकीत अजित गव्हाणेंना उमेदवारी मिळाल्यास शिवसेना अथवा राष्ट्रवादी निष्ठावंत कार्यकर्ता त्यांच्या पाठिशी राहणार नाही. त्यामुळे शिवसैनिक महेश लांडगे यांच्यामागे जावू नये, या करिता सुलभा उबाळेंना चर्चेत ठेवायचे. गावकी-भावकी आणि लांडगे कुटुंबियांत फूट पाडण्यासाठी रवि लांडगे यांना ‘लाँच’ करायचे. महेश लांडगेंवर नाराजी आहे, असे भासवून नितीन काळजे, लक्ष्मण सस्ते यांना चर्चेत ठेवायचे… असे ‘मॅनेजमेंट’ आहे. 

स्वत:ची स्पेस निर्माण करण्याची धडपड… 

आमदार महेश लांडगे यांची प्रचंड लोकप्रियता, जनमानसांसाठी राबवलेले इंद्रायणी सायक्लोथॉन, इंद्रायणी थडी, बैलगाडा शर्यत, परिवर्तन हेल्पलाईन आणि अगदी आखाड महोत्सवसारख्या भव्य-दिव्य उपक्रमांमुळे विरोधकांना सर्वसामान्यांमध्ये स्वत:ची ‘स्पेस’ निर्माण करता येत नाही, ही वस्तुस्थिती आहे. एखाद्या प्रकणात न्यायालयात साधे हजरसुद्धा राहण्याची औदार्य गव्हाणे आणि त्यांच्या समर्थकांनी दाखवले नाही. ‘‘एकाच वृत्तवाहिनीवर… एकाच ज्येष्ठ पत्रपंडितासमोर… त्याच-त्याच मुद्यांवर ठरवून मसालेदार चर्चा घडवणे आणि समर्थक कार्यकर्त्यांना लढण्याची हवा भरणे यापलिकडे काहीही नवीन नाही. जे मुद्दे सिद्ध होवू शकत नाही, यावर ‘नॅरेटिव्ह सेट’ करण्याचा हा केविलवाणा प्रयोग आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button