breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपिंपरी / चिंचवडराजकारणसंपादकीयसिटझन रिपोर्टर

Ground Report : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा ‘हुकमी एक्का’ माजी महापौर योगेश बहल पुन्हा मैदानात?

दगाफटका झालाच… तर पक्ष संघटनेत होणार बदल : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी ‘प्लॅन- बी’तयार

पिंपरी । विशेष प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड शहरात एकेकाळी बलाढ्य असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला २०१४ पासून उतरती कळा लागली. महाविकास आघाडीच्या सत्ता प्रयोगानंतर २०२३ मध्ये पक्षात मोठी फूट पडली. अजित पवार महायुतीसोबत गेले. लोकसभा निवडणुकीनंतर राजकीय वातावरण बदलले. या लाटेवर स्वार होण्यासाठी ‘दादा’ गटातील शहराध्यक्ष अजित गव्हाणेंसह ४० जण ‘साहेब’ गटामध्ये प्रवेश करणार आहेत, असा दावा केला जातो. त्यामुळे अजित पवारांची राष्ट्रवादीचा नवा चेहरा कोण? याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटाने राज्यात १० जागा लढवल्या. त्यापैकी ८ जागांवर विजय मिळवला. बारामती आणि शिरुरसारख्या बालेकिल्ला असलेल्या मतदार संघांमध्ये ‘दादा’गट पिछाडीवर राहीला. जनमत ‘साहेबांसोबत’ आहे, असा नॅरेटिव्ह सेट झाल्यामुळे आता आगामी विधानसभा निवडणुकीसाठी ‘दादा’ गटातील इच्छुकांची अस्वस्थता वाढली.

दरम्यान, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून येत्या २० जुलैरोजी पिंपरी-चिंचवडमध्ये ‘विजय संकल्प मेळावा’ घेण्यात येणार आहे. त्यासाठी शहराध्यक्ष तुषार कामठे आणि सहकारी यांनी मोठी तयारी केली आहे. या मेळाव्यात अजित पवार गटातील मोठा गट प्रवेश करणार, असे बोलले जाते. मग, अजित पवार राष्ट्रवादीचा नवीन संघटनात्मक प्रमुख कोण? याबाबत चर्चा रंगली आहे.

स्थानिकांना सक्षम पर्याय योगेश बहल अन्‌ मंगला कदम…

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची स्थापना दि. १० जून १९९९ रोजी झाली. त्यानंतर वसंत लोंढे, स्व. लक्ष्मण जगताप, आझमभाई पानसरे, योगेश बहल, संजोग वाघेरे-पाटील आणि विद्यमान शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी शहराचे संघटनात्मक प्रमुख म्हणून काम पाहिले आहे. आतापर्यंत ५ शहराध्यक्षांनी पक्षाची धुरा सांभाळली. बहल यांच्या कार्यकाळापर्यंत पक्षाचा सुवर्णकाळ होता. त्यानंतर पक्ष अनेक आव्हानांचा सामना करीत आहे. लांडे- लांडगे- जगताप अशा स्थानिकांच्या विरोधाला न जुमानता योगेश बहल आणि मंगला कदम या शहराबाहेरील नेत्यांनी राष्ट्रवादीत मोठी ‘स्पेस’ मिळवली होती. नगरसेवक, महापौर, सत्तारुढ पक्षनेता, विरोधी पक्षनेता अशी मानाची पदे स्थानिक नेत्यांच्या बरोबरीत मिळवली होती. किंबहुना, स्थानिकांना पर्याय म्हणून अजित पवार यांनी बहल-कदम गटाला ताकदी दिली होती, असे राजकीय जाणकार सांगतात. आता अजित गव्हाणे यांनी वेगळा विचार केल्यास योगेश बहल यांच्या खांद्यावर संघटनात्मक प्रमुखपदाची जबाबदारी येईल, असे निरीक्षण राजकीय जाणकार नोंदवतात.

पिंपरी विधानसभा राजकीय हालचालींचा केंद्रबिंदू….

पिंपरी विधानसभा मतदार संघाच्या राजकीय हालचाली भोसरी आणि चिंचवडच्या तुलनेत दुय्यम, असा समज आहे. पण, सध्या परिस्थिती बदललेली आहे. अनुसूचित जातींसाठी राखीव असलेला हा मतदार संघ २०२६ मध्ये खुला प्रवर्गसाठी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. कारण, मतदार संघ पुन:रचना होणार आहे. योगेश बहल आणि मंगला कदम यांना क्षमता असतानाही आमदार होता आले नाही. कारण, हे दोन्ही नेते सर्वसाधारण प्रवर्गातून आहेत. दुसरीकडे, महाविकास आघाडी आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून शहराध्यक्ष तुषार कामठे नेतृत्व करतात आणि माजी नगरसेविका सुलक्षणा शिलवंत-धर या पिंपरीतून महाविकास आघाडीच्या उमेदवारीसाठी प्रमुख दावेदार आहेत. कामठे आणि शिलवंत हे दोन्ही नेते योगेश बहल यांचे कट्टर विरोधक आहेत. त्यांच्यासह शरद पवार गटाला रोखण्यासाठी आणि विद्यमान आमदार आण्णा बनसोडे यांना ‘सेफ’ करण्यासाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून योगेश बहल यांना ताकद दिली जावू शकते. असे असले तरी, येत्या २० जुलैपर्यंत होणाऱ्या राजकीय घडामोडींवर अनेक गणिते अवलंबून राहतील, असे चित्र आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये राज्यपाल नियुक्त आमदार?

भारतीय जनता पार्टीने चिंचवड आणि भोसरीमध्ये आमदार असताना पुन्हा निष्ठावंतांना संधी या गणितानुसार, उमा खापरे आणि अमित गोरखे यांना विधान परिषदेवर संधी दिली. त्याच धर्तीवर पिंपरी-चिंचवडचा बालेकिल्ला मजबूत ठेवण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार नवा डाव टाकण्याच्या तयारीत आहेत. महायुतीने विधानसभा व विधान परिषदेतील संख्याबळ मजबूत करण्यासाठी सर्व रिक्त जागा भरण्याची तयारी केली आहे. राज्यापाल नियुक्त आमदारांच्या नियुक्तीचे प्रकरण गेल्या ३ वर्षांपासून प्रलंबित आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सदर १२ जागा भरण्यासाठी महायुतीची मोर्चेबांधणी आहे. यापैकी किमान ३ जागा राष्ट्रवादी अजित पवार गटाला मिळाणार आहे. त्यातील १ जागा पिंपरी-चिंचवडमधून भरली जाईल, त्यासाठी योगेश बहल यांचे नाव आघाडीवर आहे. त्यासाठी राष्ट्रवादीतील संभाव्य बंडखोरी आणि घसरण रोखण्याचे आव्हान बहल यांना पेलावे लागणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button