बीडमध्ये मनोज जरांगेंच्या मातोरी गावात तुफान दगडफेक, गावात तणावपूर्ण शांतता

बीड | बीडमध्ये मनोज जरांगे यांच्या मातोरी गावात दगडफेक झाली आहे. या दगडफेकीत अनेक गाड्यांचे नुकसान झाले आहे. काही गाड्यांच्या काचा फुटल्या आहेत. याप्रकरणी अधिक चौकशी पोलिसांकडून केली जातेय. दुसरीकडे सोशल मीडियावर या दगडफेकीसंदर्भात वेगळीच चर्चा पाहायला मिळतेय.
मनोज जरांगे यांचं बीड जिल्ह्यात मातोरी गाव आहे. याच गावात काल रात्री ८-८.३० च्या सुमारास दोन गट आमनेसामने आले. त्यांच्यात काही कारणावरून वाद झाला आणि दोन्ही गटातील तरूणांनी एकमेकांवर दगड-गोट्यांचा मारा केला. जवळपास अर्धा ते पाऊण तास ही दगडफेक सुरू होती, अशी माहिती स्थानिकांनी दिली. सध्या या गावात तणावपूर्ण शांतता आहे. अनेक नागरिक भीतीच्या सावटाखाली आहेत. गावात सशस्त्र पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
हेही वाचा – जो जे वांच्छिल तो ते लाहो.. मंत्री चंद्रकांत पाटील यांचा वारकऱ्यांसाठी संकल्प
दगडफेकीच्या घटनेनंतर बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी एक्सवर पोस्ट केली. ते म्हणाले, बीड जिल्ह्यातील शिरूर कासार तालुक्यात मातोरी परिसरात घडत असलेल्या घटनाक्रमावर मी लक्ष ठेवून आहे. पोलीस प्रशासनास तातडीने घटनास्थळी जाऊन परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे निर्देश दिले आहेत. माझी बीड जिल्ह्यातील सर्व जनतेला विनंती आहे की कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याचा कोणीही प्रयत्न करू नये, तसेच जिल्ह्यातील सामाजिक सौहार्द बिघडू देऊ नये.




