कराडमध्ये काँग्रेसला मोठं खिंडार, पृथ्वीराज चव्हाण यांना मोठा धक्का, विधानसभेला चॅलेंज वाढणार?
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/06/www.mahaenews.com-25-780x470.jpg)
Karad : भाजपच्या डॉ. अतुल भोसले यांनी कराडमध्ये पृथ्वीराज चव्हाण यांच्या काँग्रेसला खिंडार पाडले आहे. अतुल भोसले यांनी या माध्यमातून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांना मोठा धक्का दिला आहे. काँग्रेसचे सातारा जिल्हा सरचिटणीस, मलकापूर नगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक तथा बांधकाम सभापती राजेंद्र यादव आबा यांच्यासह तीन विद्यमान नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. मलकापूर नगरपालिकेवर काँग्रेसच्या नेतृत्वात पृथ्वीराज चव्हाण यांची बहुमतामध्ये सत्ता आहे. पण अतुल भोसले यांनी काँग्रेसला खिंडार पाडल्यामुळे पृथ्वीराज चव्हाण यांना आगामी विधानसभा निवडणूक कठीण जाण्याची शक्यता आहे. कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात भाजपाच्या अतुल भोसले यांचे पारडे जड होण्याची शक्यता आहे.
लोकसभा निवडणुकीत कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात मलकापूर शहरात या नगरसेवकांमुळेच भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले यांना आघाडी मिळाली होती. कराड मलकापूर नगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक, बांधकाम सभापती राजेंद्र यादव आबा तीन विद्यमान नगरसेवकांसह दुपारी एक वाजता मुंबई येथे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. हे नगरसेवक कार्यकर्त्यांसह मुंबईकडे रवाना होणार आहेत.
दरम्यान, पिंपरी-चिंचवडमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाची बैठक पार पडली. या बैठकीत ‘शरद पवार गट’ आणि ‘काँग्रेस’ विरोधात शिवसैनिकांनी नाराजी व्यक्त केली. पिंपरी आणि भोसरी विधानसभेत शरद पवार गटाच्या ‘तुतारी’ चिन्हाचं किंवा काँग्रेस उमेदवाराच आम्ही काम करणार नाहीत. भोसरी आणि पिंपरीत मशाल चिन्हच हवं, असा आग्रह ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी बैठकीत धरला. लोकसभेत मावळमध्ये संजोग वाघेरे यांचं ‘शरद पवार गट’ आणि ‘काँग्रेस’ने काम केलं नसल्याची खदखद बोलून दाखवत भोसरीमध्ये अमोल कोल्हे यांना शिवसैनिकांनी चांगलं लीड देत काम केल्याचा दाखला दिलाय. उद्या तिकीट कुणालाही द्यायचं आणि आम्ही काम करायचं हे आता जमणार नाही, असं परखड मत शिवसैनिकांनी मांडलय, दुसरीकडे पिंपरी विधानसभेवर ठाकरे गटाने दावा केला असून शहराध्यक्ष सचिन भोसले स्वतः इच्छुक आहेत.