वडगावशेरीत सशस्त्र टोळक्याकडून वाहनांची तोडफोड, दहा ते बारा वाहनांचे नुकसान

पुणे | किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून दारूच्या नशेत तिघांनी वडगाव शेरी येथे सशस्त्र हत्यारांनी वाहनांची तोडफोड केल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्री तीन वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी तिघांना ताब्यात घेण्यात आले असून यामध्ये दोन अल्पवयीन बालकांचा समावेश आहे. वडगाव शेरी येथील गणेश नगर परिसरात वाहनांची तोडफोड झाली असून यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवार( दि.21) मध्यरात्री तीन वाजण्याच्या सुमारास गणेशनगर वडगावशेरी परिसरातील रस्त्यावर अज्ञात इसमानी वाहनांची तोडफोड केल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी पोलिसांना दिली. चंदननगर पोलिसांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेऊन माहिती घेतली असता किरकोळ वादातून दारूच्या नशेत लोखंडी हत्यारांनी वाहनांची तोडफोड करीत दहशत निर्माण केल्याचा प्रकार झाल्याचे निष्पन्न झाले.
हेही वाचा – ऑलिम्पिक दिनानिमित्त बाणेरमध्ये खेळाडूंसाठी परिसंवाद
पोलिसांनी घटनास्थळावरून एकाला तर काही वेळातच उर्वरित दोघांनाही ताब्यात घेतले आहे. या घटनेत वाहनांचे मोठे नुकसान झालेले आहे.यामध्ये काही दुचाकी, चार चाकी तसेच रिक्षा अशा दहा ते बारा वाहनांची तोडफोड करण्यात आलेली आहे. नुकसान करण्यात आलेल्या वाहनांमध्ये एका ड्रायव्हिंग स्कूलच्या वाहनांचा देखील समावेश आहे. या प्रकरणी चंदन नगर पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करून आरोपींना ताब्यात घेतले आहे.
घटनास्थळी पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त विठ्ठल दबडे, पोलीस निरीक्षक गुन्हे पंडित रेजितवाड यांच्यासह रात्रगस्तीचे अधिकारी व अंमलदार यांनी भेट दिली. वाहनांची तोडफोड करून सर्वसामान्यांचे नुकसान करणाऱ्या सराईतांवर कठोर कायदेशीर कारवाईची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पालवे करीत आहेत.





