आरक्षण प्रश्नावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रथमच फ्रंटफूटवर
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/06/mahaenews-6-1-780x470.jpg)
Devendra Fadnavis : मराठा आरक्षण प्रश्नावर मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांनी तीन उपोषण केले. त्यांची उपोषणाची सुरुवात अंतरवली सराटीतून झाली. पहिल्या उपोषणा दरम्यान अंतरवलीत झालेल्या लाठीचार्ज प्रकरणानंतर मराठा समाज आक्रमक झाला होता. त्यांचा राग गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर होता. मनोज जरांगे यांनी अनेक वेळा देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात भूमिका घेतली होती. त्यानंतर मनोज जरांगे यांचे आंदोलन स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांनी हाताळले होते. देवेंद्र फडणवीस या प्रकरणात कधी फ्रंटफूटवर आले नाही. परंतु लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर देवेंद्र फडणवीस आरक्षण प्रकरणात फंटफूटवर येऊ लागले आहेत.
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपचा मोठा पराभव झाला. त्याला एक कारण मराठा आरक्षण आहे. या प्रकरणात भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा मराठा आरक्षण विरोधक अशी करण्यात आली. त्यामुळे आता प्रतिमा संवर्धन अन् आरक्षण आंदोलन प्रकरणात देवेंद्र फडणवीस पुढे येऊ लागले आहेत. त्यांनी मराठा आणि ओबीसी समाजाचा प्रश्न सोडवण्यास पुढकार घेतला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीवर प्रतिक्रिया दिली होती. मनोज जरांगे यांच्या मागणीनुसार मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेतले जात आहेत, असे फडणवीस यांनी सांगितले.
हेही वाचा – ..म्हणून आजच्या दिवशी केली जाते वटपौर्णिमेचे पूजा; जाणून घ्या वटपौर्णिमेचे महत्व!
एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारानंतर मराठा समाज समाधानी झाला नाही. मनोज जरांगे पाटील यांनी सगेसोरऱ्याची मागणी लावून धरली आहे. त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस यांनी फ्रंटफूटवर येण्याचा निर्णय घेतला असण्याची शक्यता आहे. मराठा आंदोलकांप्रमाणे ओबीसी आंदोलकांसोबत चर्चा त्यांनी सुरु केली आहे. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचे गेल्या नऊ दिवसांपासून उपोषण सुरु आहे. त्यांनी उपोषण मागे घ्यावे, यासाठी सरकारतर्फे शिष्टमंडळ शुक्रवारी पाठवण्यात आले. या शिष्टमंडळात देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू गिरीश महाजन होते.