आषाढी वारीच्या तोंडावर इंद्रायणी नदी झाली प्रदूषित, नदी पात्र फेसाळलं
हजारो वारकरी आळंदीत, फेसाळलेल्या पाण्यामुळे आरोग्य धोक्यात
![At the mouth of Ashadhi Vari, the river Indrayani became polluted, the riverbed became foamy](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/06/Indrayani-River-780x470.jpg)
पिंपरी | आळंदीमध्ये पुन्हा एकदा इंद्रायणी नदी फेसाळली आहे. मागील सलग दोन दिवसांपासून नदीतील पाण्यावर मोठ्या प्रमाणात तवंग येत आहेत. त्यामुळे श्री संत ज्ञानेश्वर माऊलींच्या इंद्रायणीचे पावित्र्य धोक्यात आले आहे. दरम्यान, नदीकाठच्या गावांमध्ये प्रशासनाने तातडीने सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
इंद्रायणी नदीचा उगम हा लोणावळा परिसरातून झाला. ही नदी अनेक गावे, शहरे पार करत आळंदीतून पुढे वाहत जाते. इंद्रायणी नदीचे १९ किलोमीटर पात्र पिंपरी-चिंचवड शहरातून वाहते. शहरातील औद्योगिक वसाहती, इंद्रायणी नदीकाठच्या कारखान्यातील रसायनयुक्त पाणी, गावांमधील मैलायुक्त पाण्यावर कोणतीही प्रक्रिया न करता थेट इंद्रायणी नदी पात्रात सोडले जाते. मैलायुक्त पाणी हे इंद्रायणी नदीला प्रदूषित करत आहे.
हेही वाचा – ‘मोदींना शपथ घेऊ द्या, पण सरकार टीकणार नाही’; ठाकरे गटातील नेत्याचं मोठं विधान
इंद्रायणी नदी पात्रात लाखो वारकरी मोठ्या श्रद्धेने स्नान करून माऊलींचे दर्शन घेतात. परंतु, नदीची अवस्था बघता लाखो वारकऱ्यांचे आणि आळंदीतील ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. आधीच जलपर्णीने इंद्रायणीचा श्वास गुदमरत आहे. आता त्यात जलप्रदूषणाची भर पडली असून, अवघ्या नदी पात्रात तवंग दिसत आहे. रसायनयुक्त पाणी सोडल्यानेच नदीची अशी अवस्था झाल्याचे बोलले जात आहे. गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा आळंदीत पाण्यावर तवंग येत आहेत. आषाढी पायी वारी पालखी सोहळा काही दिवसांवर येऊन ठेपला असताना नदीतील पाण्यावर तवंग आले आहेत.