सारथी हेल्पलाईन : हॅलो मी पक्षनेता एकनाथ पवार बोलतोय…
- पक्षनेते एकनाथ पवार यांनी केले सारथीवरील तक्रारींचे ऑडीट
- तक्रारदारांशी साधला प्रत्यक्ष संवाद
- कर्मचा-यांच्या सहकार्याबद्दलही केली विचारणा
पिंपरी, (महा ई न्यूज) – सारथीवरील आमच्या तक्रारींचा निपटारा होत नसल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्यानंतर पक्षनेते एकनाथ पवार यांनी स्वतः सारथीला भेट देऊन गेल्याच आठवड्यात अधिका-यांचा समाचार घेतला होता. यापुढे प्रत्येक आठवड्याला तक्रारींचे ऑडीट करण्याच्या सूचना देखील त्यांनी दिल्या होत्या. त्यानुसार पक्षनेते एकनाथ पवार यांनी पुन्हा आज बुधवारी (दि. 3) सारथी विभागाला भेट देऊन कर्मचा-यांची उलटतपासणी केली. त्यांनी तक्रारदारांशी प्रत्यक्ष संवाद साधून कर्मचा-यांच्या सहकार्याबाबत त्यांच्याशी विचारणा देखील केली.
पिंपरी पालिकेचे तत्कालीन आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांचा ड्रिम प्रोजेक्ट म्हणून नावारूपाला आलेल्या सारथीला अवकळा आली आहे. त्यांच्या बदलीनंतर मात्र राजीव जाधव, दिनेश वाघमारे या आयुक्तांनी सारथीकडे दुर्लक्ष केले. तेव्हापासून ते आजपर्यंत तक्रारींचा निपटारा होत नसल्यामुळे तक्रारदारांनी पक्षनेते एकनाथ पवार यांच्याकडे याची तक्रार केली होती. त्याची दखल घेऊन पवार यांनी गेल्याच आठवड्यात (दिल. 21 सप्टेंबर) पालिकेतील सारथी विभागाल प्रत्यक्ष भेट दिली होती. त्यावेळी कर्मचा-यांना तक्रारी वेळीच सोडविण्याच्या सूचना देखील त्यांनी केल्या होत्या. आठ दिवसाला तक्रारींचे ऑडीट करून अहवाल सादर करण्याच्या सूचना देखील त्यांनी दिल्या होत्या. याची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी पवार यांनी आज अचानक सारथी विभागाला भेट दिली.
त्यांनी तक्रारींची संख्या पाहून प्रलंबित तक्रारदारी तातडीने सोडविण्याच्या सूचना पुन्हा प्रशासनाला दिल्या आहेत. तसेच, एवढ्या तक्रारी प्रलंबित का राहत आहेत, याची विचारणाही त्यांनी कर्मचा-यांना केली. तक्रारींचा निपटारा झालेल्या तक्रारदारांना त्यांनी स्वतः संपर्क साधून संवाद साधला. तक्रारी सोडविण्याच्या बाबतीत अधिकारी, कर्मचारी सहकार्य करतात का, याची देखील त्यांनी विचारणा केली. त्यावर दोन तक्रारदारांनी सहकार्य मिळते असे सांगितले. तर दोन तक्रारदारांनी सहकार्य मिळत नाही, असे स्पष्ट सांगितले. तर, दोन क्रमांक बोगस निघाले. त्यांनी सर्व प्रलंबित तक्रारी तातडीने सोडविण्याच्या सूचना पुन्हा सारथी विभागातील अधिका-यांना केल्या आहेत. त्यांच्यासोबत मनसेचे पालिकेतील गटनेते सचिन चिखले होते.