आढळराव पाटील आणि अमोल कोल्हे यांचा आज भोसरी विधानसभेत प्रचार दौरा
लोकसभा रणसंग्राम : महायुती-महाविकास आघाडीचे उमेदवार आमने-सामने
![Adhalrao Patil and Amol Kolhe are campaigning in Bhosari Assembly tomorrow](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/04/Bhosari-780x470.jpg)
भोसरी : शिरूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या आरोप प्रत्यारोपांमध्ये सध्या प्रचारही शिगेला पोचला असल्याचे पाहायला मिळत आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने महायुतीचे उमेदवार शिवाजी आढळराव पाटील आणि महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे हे दोघेही उद्या शनिवार दिनांक 20 एप्रिल रोजी सकाळी दिवसभर भोसरी विधानसभेतील विविध गावांना भेटी देत नागरिकांशी संवाद साधणार आहेत.
शिवाजी आढळराव पाटील सकाळी नऊ ते दुपारी दोन वाजेपर्यंत मोशी व जाधववाडी भागात प्रचार करणार असून, दुपारी तीन ते रात्री नऊ वाजेपर्यंत कुदळवाडी परिसरात प्रचार दौरा करणार आहे. यावेळी भोसरीचे आमदार महेश लांडगे, मा. आमदार विलास लांडे, इरफान सय्यद, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, विजू फुगे, शरद बुट्टे पाटील, बाळा भागवत, वसंत बोराटे, कविता आल्हाट, उत्तम आल्हाट, किसन बावकर, मा. महापौर राहुल जाधव, अश्विनी जाधव आदी उपस्थित राहणार आहेत.
दरम्यान अमोल कोल्हे सकाळी दहा ते दोन वाजेपर्यंत तळवडे, रूपीनगर, सहयोगनगर, त्रिवेणीनगर त्यानंतर तीन ते सहा वाजेपर्यंत सेक्टर 22, निगडी, यमुनानगर व सायंकाळी सहा ते आठ वाजेपर्यंत अजंठानगर, कृष्णानगर, पूर्णनगर, घरकूल, नेवाळेवस्ती या भागात प्रचार करणार आहेत.