ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
बनावट पोलीस चरित्र पडताळणी प्रमाणपत्र बनवणाऱ्या तरुणाला गुन्हे शाखेकडून अटक
पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेची कारवाई
पिंपरी : पोलीस चरित्र पडताळणीचे बनावट प्रमाणपत्र तयार करणाऱ्या तरुणाला पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेने अटक केली. तरुणाकडून पोलीस चरित्र पडताळणीची ५१ बनावट प्रमाणपत्र जप्त करण्यात आली आहेत. गणेश संजय कुंजकर (वय २४, रा. बेघरवस्ती, भुईंज, ता. वाई, जि. सातारा) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे.
गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुलभ कॉलनी रहाटणी येथे एक तरुण पोलीस चरित्र पडताळणीचे बनावट प्रमाणपत्र तयार करून ते नागरिकांना देऊन त्यांची फसवणूक करत असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट एकला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तरुणाला ताब्यात घेतले. तरुणाकडून ४० हजार रुपये किमतीचे लॅपटॉप, मोबाईल फोन तसेच पोलीस चरित्र पडताळणीची ५१ बनावट प्रमाणपत्र जप्त करण्यात आली आहेत. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.





