साताऱ्यात भाजपकडून उदयनराजेंनाच उमेदवारी, विद्यमान खासदाराचा दावा
![Ranjitsinh Nimbalkar said that Udayanraje Bhosale is a candidate from BJP in Satara](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/03/Udayanraje-Bhosale-1-780x470.jpg)
सातारा | महायुतीत सातारा लोकसभा मतदारसंघाची जागा भाजप आणि राष्ट्रवादीसाठी डोकेदुखी ठरत आहेत. महायुतीकडून साताऱ्यात उदयनराजे भोसले यांना उमेदवारी देण्यावर एकमत झाले आहे. मात्र, महायुतीत ही जागा राष्ट्रवादीकडेच राहणार असल्याच्या भुमिकेवर अजित पवार ठाम आहे. अशात भाजपचे खासदार रणजीत नाईक निंबाळकर यांनी मोठा दावा केला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत झालेल्या भेटीनंतर निंबाळकरांनी ही माहिती दिली आहे.
खासदार रणजीत नाईक निंबाळकर म्हणाले की, सातारा लोकसभेसाठी छत्रपती उदयनराजे भोसले यांची भाजपकडून उमेदवारी निश्चित करण्यात आली आहे. उद्या घोषणा होण्याची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्र महायुतीच्या प्रचाराचा नारळ माढा लोकसभेतील माळशिरस येथे फुटणार आहे. तसेच, यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सर्व सहयोगी पक्षाचे नेते उपस्थित राहणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. यानंतर उपमुख्यमंत्री आपले कुलदैवत असणाऱ्या निरा नरसिंहपूर येथे जावून नरसिंहाचं दर्शन घेणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
हेही वाचा – अभिजीत बिचुकले साताऱ्यातून लोकसभा निवडणूक लढवणार, उदयनराजेंबद्दल म्हणाले..
दरम्यान, साताऱ्यात उद्या उदयनराजेंचा भव्य सत्कार केला जाणार आहे, असे पोस्टर्स फिरू लागले आहेत. तर दुसरीकडे राष्ट्रवादीला बारामती, रायगड, शिरूर, नाशिक आणि परभणी या पाच जागा मिळणार अशी माहिती मिळत आहे. म्हणूनच, राष्ट्रवादीने साताऱ्यावरील आग्रह सोडला का? असा प्रश्न निर्माण होत आहे.