बारामतीच्या जागेवरून पेच कायम, विजय शिवतारे लढण्यावर ठाम…
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/03/महायुतीची-राज-ठाकरेंना-ऑफर-7-780x470.jpg)
Loksabha 2024 : राज्यात २० उमेदवार जाहीर केले आहेत. महायुतीत जागावाटपावरुन तिढा कायम आहे.भाजपने काही जागांवर अजून वाद सुरुच आहे. यातील एक जागा म्हणजे बारामती. बारामतीत राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उमेदवार सूनेत्रा पवार यांना तिकिट मिळणं जवळपास निश्चित आहे. पण शिंदे गटाचे आमदार विजय शिवतारे यांनी अजित पवार यांना आव्हान दिल्याने बारामतीची पेच कायम आहे.
विजय शिवतारे यांनी बारामतीमधून लोकसभा निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. आपण माघार घेणार नसून, वेळ पडल्यास अपक्ष लढू असा निर्धार विजय शिवतारे यांनी केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विजय शिवतारे यांच्याशी चर्चा करुन तोडगा काढण्याचाही प्रयत्न केला. पण शिवतारे आपल्या निर्णयावर ठाम आहेत.
विजय शिवतारे यांनी आज काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनंतराव थोपटेंची भेट घेतलीय. या भेटीच्यावेळी शिवतारेंनी थोपटेंना भूतकाळात पवारांमुळे झालेल्या पराभवाची आठवण करुन दिली. मागच्या आठवड्यात पवारांनीही थोपटेंची भेट घेतली होती. त्यामुळे बारामती लोकसभेत तिरंगी लढत रंगणार असून, थोपटे कुणाला साथ देणार…? याकडे सर्वांचं लक्ष आहे.
हेही वाचा – ‘आम्हाला भाजपाची बी टीम म्हटलं जातं, पण..’; निवडणूक रोख्यांबद्दल ओवैसीचं महत्वाचं विधान
विजय शिवतारे यांनी अजित पवारांच्या मुलाविरोधात प्रचार केला होता. याचा राग अजित पवारांनी मनात ठेवला. तू पुन्हा कसा निवडून येतो हे पाहतो. मी कोणाला पाडायचं ठरवलं तर कोणाच्या बापाचं ऐकत नाही, असं आव्हानच अजित पवार यांनी शिवतारेंना दिलं होतं. आम्हीच पुण्याचे मालक अशी यांची मानसिकता आहे. ती मोडली पाहिजे. फसवेगिरी करणं आमचा जन्मसिद्ध अधिकार आहे अशा अविर्भावात असतात. यांना कसलाच पश्चाताप नाही,” असा आरोप विजय शिवतारे यांनी केला आहे.
दरम्यान, बारामतीत अजित पवारांची पत्नी सुनेत्रा पवारांच्या उमेदवारीवरून हर्षवर्धन पाटलांनी नाराजी व्यक्त केली होती. त्याबाबत फडणवीसांनी हर्षवर्धन पाटलांची नाराजी दूर केलीय. फडणवीसांनी हर्षवर्धन पाटलांना चर्चेसाठी सागर बंगल्यावर बोलावलं होतं. या भेटीत फडणवीसांनी हर्षवर्धन पाटलांचं म्हणणं ऐकून घेत, मतदारसंघाबद्दल सकारात्मक चर्चा केली. यावेळी सगळ्यांनीच युतीधर्म पाळला पाहिजे असं हर्षवर्धन पाटील म्हणालेत.
माढा लोकसभा मतदारसंघात महायुतीबाबत अजूनही अनिश्चिचतता आहे. महायुतीत रामराजे नाईक निंबाळकरांची नाराजी दूर झाली असली तरी मोहिते पाटील कुटुंब अजूनही निवडणूक लढण्यावर ठाम आहेत. माघार घेणार नाही असा निश्चय करत मोहिते पाटील कुटुंबानं मतदारसंघात गाठी-भेटींचा सपाटा लावलाय. धैर्यशील मोहिते पाटील सांगोला दौऱ्यावर आहेत, तर त्यांच्या पत्नी शितलदेवी मोहिते पाटील करमाळा विधानसभा मतदारसंघात असतील.. तर चुलत भाऊ शिवतेज सिंह मोहिते पाटील माढा विधानसभा मतदारसंघ पिंजून काढतायत, त्यांनी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे बंधू आणि सोलापूर जिल्हा शिवसेना संपर्कप्रमुख शिवाजीराव सावंत यांची भेट घेतली. सावंतांनी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या टेंभुर्णीतल्या बैठकीला दांडी मारली होती, त्यामुळे सावंत यांची भूमिका महत्त्वाची मानली जातेय.. खासदार नाईक निंबाळकर यांच्यावर नाराज नेत्यांना गळाला लावण्याचे प्रयत्न मोहिते पाटील करतायत. अजूनही त्यांची नाराजी दूर झाली नसून ते वेगळी वाट पकडतील अशी शक्यता वर्तवण्यात येतेय..