घाटकोपरमध्ये ७२ लाखांची रोकड जप्त, निवडणूक आयोगाची कारवाई

मुंबई | निवडणूकीचे बिगुल वाजत नाही तोच घाटकोपरच्या स्टॅटिक सर्विलेन्स स्कॉडने ही कारवाई केली आहे. या प्रकरणी दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. इलेक्शन सेलच्या स्टॅटिक सर्विलेन्स स्कॉडने गाडीतून ७२ लाख ३९ हजार ६७५ रुपये जप्त केले आहेत.
ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्तींपैकी एक सीए तर दुसरा इनक्मटॅक्स प्रॅक्टिसनर असल्याचे समोर आलं आहे. जप्त करण्यात आलेली रक्कम एका विकासकाकडून पाठवण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पंतनगर पोलिस आणि इलेक्शन सेलच्या स्टॅटिक सर्विलेन्स स्कॉड अधिक तपास करत आहेत.
हेही वाचा – ‘५० वर्षांत पवारांनी जे केले नाही, ते पाच वर्षात करून दाखवणार’; विजय शिवतारे
मिळालेल्या माहितीनुसार, निलयोग मॉल च्या समोर, विधानसभा मतदारसंघ-१७० घाटकोपर पूर्व या ठिकाणी एका फोर व्हीलर वाहनातून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पैसे येणार असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार मंगळवारी रात्री साडे आठच्या सुमारास निवडणूक सेलने वाहनाची तपासणी केली. त्यामध्ये ७२,३९,६७५ रुपये मिळून आले आहेत. या वाहनांमध्ये दिलीप वेलजी नाथानी ५२ वर्षे, अतुल वेल्जी नाथांनी वय ५४ वर्षे दोघे जण मिळून आले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी सांगितले की ते इन्कम टॅक्स प्रॅक्टिसनर व सी.ए आहेत. त्यांना ही रोख रक्कम वाशी मधील अक्षर ग्रुप बिल्डर भरत पटेल यांनी दिली असल्याचे सांगितले.
वाहनसहित दोघांना ताब्यात घेत पंतनगर पोलीस ठाण्यात आणले. तेथे डेप्युटी कलेक्टर रवींद्र ठाकरे तसेच तहसीलदार वृषाली पाटील व इतर अधिकारी, इन्कम टॅक्स चे अधिकारी मनीष कुमार यांनी चौकशी केली. तसेच, आयकर विभागाने रक्कम चौकशीसाठी ताब्यात घेतली आहे.





