‘..तर मी कधीच राजकारणात आलो नसतो’; नितीन गडकरींनी सांगितली आठवण
![Nitin Gadkari said that he would not have come into politics if emergency had not been imposed in the country](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/03/Nitin-Gadkari-780x470.jpg)
मुंबई | ‘रामनाथ गोयंका एक्सिलन्स इन जर्नालिझम अवॉर्ड’ या पुरस्कारांचे वितरण नितीन गडकरी यांच्या हस्ते पार पडले. या कार्यक्रमात बोलताना त्यांनी आणीबाणीच्या काळातील संघर्षांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. देशात आणीबाणी लादली गेली नसती तर आपण राजकारणात आलो नसतो असं म्हणत, असं नितीन गडकरी म्हणाले.
नितीन गडकरी म्हणाले की, देशात आणीबाणी लादली गेली नसती तर मी राजकारणात आलो नसतो. १९७५ मध्ये आणीबाणी लागू झाली, तेव्हा मी दहावीची परीक्षा देणार होतो. त्यानंतरच्या दोन वर्षांमध्ये माझ्या कुटुंबातील अनेक सदस्यांना ‘मिसा’खाली अटक करण्यात आली होती. त्यावेळी मी ठरवले होते की, मी आणीबाणीविरोधात लढणार. आणीबाणीच्या काळातील संघर्ष आम्ही कोणी आयुष्यभर विसरू शकणार नाही.
हेही वाचा – अजित पवार गटाला मोठा धक्का! ‘या’नेत्याचा राजीनामा, शरद पवार गटात जाणार?
आणीबाणीविरोधात लढण्यासाठी रामनाथ गोएंका हे आमच्यासाठी लढण्याचे स्त्रोत होते. त्यांनी आणीबाणीच्या पहिल्या दिवसापासून तीव्र संघर्ष केला. गोएंका यांच्याप्रमाणे आणीबाणीविरोधात लढणाऱ्या अनेक कुटुंबांना खूप मोठी किंमत चुकवावी लागली होती. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नानाजी देशमुखांसोबत रामनाथ गोएंका यांना भेटण्याची संधी मला मिळाली. त्यांचे विचार, कृती, त्यांचे व्यक्तिमत्व बघून मी खूप प्रभावित झालो होतो, असं नितीन गडकरी म्हणाले.
देश बदलत असून नवी पिढीच्या आशा-आकांक्षा लक्षात घेऊन पत्रकारिताही बदलत असल्याचे प्रतिपादन नितीन गडकरी यांनी केले. नेत्यांनी काय म्हटले वा म्हटले नाही, या लढाईमध्ये जनतेला फारशी रूची नाही. नव्या पिढीला ज्ञान व विज्ञानाची भूक आहे. नैतिकता, पर्यावरण आणि अर्थकारण या तिन्ही बाबतीत तरुण पिढी अत्यंत जागरुक आहे. त्यामुळे पत्रकार एखाद्या विषयामध्ये सखोल अभ्यास करून लिहितो, तेव्हा त्यांचे लिखाण फक्त वाचवण्यासाठी नसते. त्या लिखाणातून लोकांना नवा दृष्टिकोन मिळतो. संगीत, नाटक, क्रीडा अशा विविध क्षेत्रांतील सखोल लिखाणांतून जनतेपर्यंत संदेश पोहोचत असतो. त्यातून त्यांचे व्यक्तिगत आयुष्य बदलते. त्यामुळेच रामनाथ गोएंका पुरस्कारासाठी निवडले गेलेले विविध विषय देशासाठी महत्त्वाचे ठरतात, असंही नितीन गडकरी म्हणाले.