अजित पवार गटाला मोठा धक्का! ‘या’नेत्याचा राजीनामा, शरद पवार गटात जाणार?
पुणे | आगामी लोकसभा निवडणुकीआधी अजित पवार यांना मोठा धक्का बसला आहे. अजित पवार गटातील नेते बजरंग सोनवणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आहे. बजरंग सोनवणे यांनी सुनील तटकरे यांना पत्र लिहून राजीनामा सादर केला आहे. अजित पवार गटातून बाहेर पडल्यानंतर आज दुपारी साडेचार वाजता सोनवणे हे शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत, अशी माहिती मिळत आहे.
बजरंग सोनवणे यांनी राजीनाम्याची प्रत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे बीडचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांना देखील सुपूर्द करण्यात आली आहे. ‘मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष च्या प्राथमिक सदस्याचा राजीनामा सादर करीत आहे’, असा एका ओळीचा मजकूर या पत्रावर लिहिला आहे. बजरंग सोनवणे यांनी काही दिवसांपुर्वी शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यामुळे ते शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.
बजरंग सोनवणे कोण आहेत?
शेतकरी पुत्र म्हणून बजरंग सोनवणे यांनी लोकसभेची निवडणूक राष्ट्रवादीकडून लढवली होती. या निवडणुकीत बजरंग सोनवणे यांचा पराभव झाला. बजरंग सोनवणे यांनी बीड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून काम पाहिले. येडेश्वरी शुगर या खासगी साखर कारखान्याचे ते चेअरमन व कार्यकारी संचालक म्हणून कार्यरत. केज विधानसभा मतदार सघात बजरंग सोनवणे यांचा स्वतःचा एक वेगळा गट आहे. बजरंग सोनवणे हे बीड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष होते. बजरंग सोनवणे यांच्या कन्या डॉक्टर हर्षदा सोनवणे यांचा केज नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये पराभव झाला.