गोकुळच्या १२ संचालकांचा मुक्काम उदयपूरमध्ये; सतेज पाटलांचा मोठा दावा
महायुतीचे संचालक गोवा, सुरतमार्गे उदयपूरला पोहोचल्याचा दावा; मॅरिएट हॉटेलमधील रूम नंबरही माहिती असल्याचे पाटील म्हणाले

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या अध्यक्षपदाच्या निवडीवरून कोल्हापूरच्या राजकारणात जोरदार घडामोडी सुरू आहेत. गोकुळच्या संचालक मंडळात सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील समविचारी पॅनेलचे १३, तर महायुतीचे १२ संचालक निवडून आले आहेत. मात्र, अध्यक्ष निवडीसाठी आवश्यक असलेला १४ संचालकांचा कोरम पूर्ण न झाल्याने निवड प्रक्रिया रखडली आहे. या पार्श्वभूमीवर महायुती सरकारने सहकार कायद्यात बदल करून पाच शासकीय संचालक नियुक्त करण्याचा अध्यादेश काढल्याने राजकीय वाद अधिक तीव्र झाला आहे. यापैकी चार शासकीय संचालकांना मतदानाचा अधिकार देण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
अध्यक्षपदाच्या निवडणुकीत दगाफटका होऊ नये, यासाठी दोन्ही बाजूंनी आपल्या संचालकांना एकत्र ठेवण्याची खबरदारी घेतली आहे. महायुतीचे १२ संचालक अलिबागमध्ये असल्याची चर्चा होती. मात्र, हे संचालक सध्या उदयपूरमध्ये असल्याचा दावा काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी केला आहे.
‘मुंबई तक’ला दिलेल्या मुलाखतीत सतेज पाटील यांनी याबाबत माहिती दिली. महायुतीचे १२ संचालक गोवा आणि सुरतमार्गे उदयपूरला पोहोचले असून, तेथील मॅरिएट हॉटेलमध्ये मुक्कामी असल्याचे त्यांनी सांगितले. या संचालकांच्या खोल्यांचे क्रमांकही आपल्याला माहिती असल्याचा दावा त्यांनी केला. हे सर्व संचालक हॉटेलच्या पहिल्या मजल्यावर असून, त्यांच्या खोल्यांचे क्रमांक १३० पासून सुरू होतात, असे पाटील म्हणाले.
या संचालकांकडून एका प्रतिज्ञापत्रावर सह्या घेतल्या जात असल्याची माहितीही आपल्याला मिळाली आहे. मात्र, त्या प्रतिज्ञापत्रात नेमके काय लिहिले आहे, याची संबंधित संचालकांनाही कल्पना नसल्याचा दावा पाटील यांनी केला.
हेही वाचा – मुलांच्या संगोपनाबाबत तुकाराम मुंढेंची स्पष्ट भूमिका; व्यसनांपासून दूर राहण्याचे संस्कार
सत्ताधारी गटातूनही माहिती मिळत असल्याचा दावा
गोकुळवर शासकीय संचालक नियुक्त करण्याचा निर्णय महायुतीमधील काही नेत्यांनाही मान्य नसल्याचे सतेज पाटील यांनी मुलाखतीत सांगितले. मंत्रिमंडळाच्या बैठकीत गोकुळबाबत काय चर्चा होते, याची माहितीही आपल्याला मिळत असल्याचे ते म्हणाले.
आपण सध्या सत्तेत किंवा मंत्रिपदावर नसलो, तरी विविध पक्षांतील नेत्यांशी असलेल्या संबंधांमुळे राजकीय घडामोडींची माहिती मिळते. गेल्या ३० वर्षांपासून राजकारणात सक्रिय असून, सत्तेत असताना अनेकांची कामे केली आहेत. त्यामुळे सर्वच पक्षांतील नेत्यांशी आपले संबंध असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.
गोकुळच्या अध्यक्षपदाची निवड, शासकीय संचालकांचे मतदानाचे अधिकार आणि दोन्ही गटांची राजकीय रणनीती यामुळे आगामी घडामोडींकडे कोल्हापूरच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.




