लोकसभा निवडणूक रणसंग्राम : मावळमध्ये संजोग वाघेरे यांना ‘शेकाप’ची ताकद!
शेकापची तीन लाख मते निर्णायक : महायुतीला महाविकास आघाडीचे मोठे आव्हान
![Lok Sabha election battle: Sanjog Vaghere has the strength of 'SHEKAP' in Maval!](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/03/ैंSanjog-Waghere-2-780x470.jpg)
पिंपरी : लोकसभा निवडणुकीच्या तयारीला सुरुवात झाली असून मावळ लोकसभा मतदारसंघात महत्वाचा असलेल्या शेतकरी कामगार पक्षाने महाविकास आघाडीला पाठींबा दिल्याने मावळचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांना मोठे बळ मिळणार आहे.
मावळ हा लोकसभा मतदारसंघ रायगडमधील उरण पनवेल आणि कर्जत आणि पुण्यातील पिंपरी चिंचवड आणि मावळ अशा तीन विधानसभा मतदार संघाचा समावेश आहे. रायगडमधील दोन विधानसभा मतदार संघात शेतकरी कामगार पक्षाची ताकद निर्णायक आहे.
मावळ लोकसभा मतदारसंघात शेकापचे किमान तीन लाख मतदार आहेत. त्यामुळे ही संख्या निर्णायक आहे. तर सध्याच्या राजकीय फाटफुटीत एक गठ्ठा मते महत्वाची आहेत. उरण आणि पनवेल हे दोन्ही मतदारसंघ हे शेकापची पारंपरिक आहेत. स्थानिक पातळीवरील पक्षाची ताकद टिकून आहे. याचा फायदा हा लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला होणार आहे. अर्थात संजोग वाघेरे यांची ‘मशाल’ परिवर्तनाची नांदी घेवून येणार, असे निरीक्षण राजकीय जाणकारांनी नोंदवले आहे.
पिंपरी विधानसभेतून परिवर्तनाची नांदी…
दरम्यान, संजोग वाघेरे यांचे ‘होम पिच’ असलेल्या पिंपरीतून परिवर्तनाची नांदी सुरू करण्याचा निर्धार पिंपरी ग्रामस्थांनी केला आहे. या निमित्ताने आयोजित बैठकीत गावातील गावकी-भावकी आणि नाती-गोती यांच्यातील मतभेद विसरुन एकदिलाने पिंपरी गावचा स्वाभिमान संसदेत पाठवण्याचा संकल्प करण्यात आला. विशेष म्हणजे, पिंपरी विधानसभा मतदार संघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी आमदार गौतम चाबुकस्वार आणि महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्रित मेळावा घेतला आणि मावळ लोकसभा मतदार संघातील परिवर्तनाची सुरूवात पिंपरीतून होईल, असा दावा केला आहे.