महायुतीत पडणार मिठाचा खडा? लोकसभेच्या ‘त्या’ फॉर्म्युलावर शिंदे गट आक्रमक
![Gajanan Kirtikar said Shiv Sena is not tied to BJP's claim](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/02/Eknath-Shinde-Devendra-Fadnavis-and-Ajit-Pawar-780x470.jpg)
मुंबई | आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला असल्याच्या बातम्या पाहायला मिळत आहेत. महायुतीत भाजपाला ३२, शिवसेनेच्या शिंदे गटाला १२ आणि अजित पवार गटाला ४ जागा दिल्या जाणार असल्याचा कथित फॉर्म्युला सध्या समाजमाध्यमांवरही व्हायरल होत आहे. यावर आता शिवसेनेच्या शिंदे गटाचे नेते आणि खासदार गजानन कीर्तिकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
खासदार गजानन कीर्तिकर म्हणाले की, हा जो फॉर्म्युला तयार केला आहे, त्याची काही अधिकृत घोषणा झालेली नाही. हे जे ३२-१२-४ आकडे आपल्याला पाहायला मिळत आहेत, याला काही आधार नाही. मुळात जागावाटपाची चर्चा कोण करतंय? त्याचा निर्णय कोण घेतंय? कुठल्या पक्षातील कोणते नेते, कोणती प्रमुख माणसं यावर काम करत आहेत? किंवा यासंबंधीचा निर्णय कोण घेत आहे? याबाबतची कुठल्याही प्रकारची माहिती आमच्याकडे नाही. मी शिवसेनेचा एक नेता आहे. आमचे मुख्य नेते पक्षाची भूमिका ठरवताना माझ्यासह आमच्याबरोबर असलेल्या इतर नेत्यांशी चर्चा करतील अशी अपेक्षा आहे. १२ जागांबाबतचा प्रस्ताव आम्हाला अजिबात मान्य नाही.
हेही वाचा – WPL 2024 | अवघ्या दोन दिवसांत WPL स्पर्धा होणार सुरु! जाणून घ्या संपूर्ण माहिती
महायुतीत शिवसेनेला लोकसभेच्या १२ जागा देण्याबाबत काही ठरलं असेल तर ते आम्हाला मान्य नाही. २०१९ च्या लोकसभेचा विचार करता आमचा २२ जागांवर दावा आहे. गेल्या निवडणुकीत भाजपा २६ जागांवर लढली होती. त्यांचे तीन उमदवार पराभूत झाले आणि त्यांनी २३ जागा जिंकल्या. तर आम्हाला २२ जागा मिळाल्या होत्या. त्यापैकी आमचे चार उमेदवार पडले आणि आम्ही १८ जागा जिंकल्या. तसेच राज्यात विरोधी पक्षांचे सात उमेदवार जिंकले, असं गजानन कीर्तिकर म्हणाले.
एकनाथ शिंदेंबरोबर आलेल्या १३ खासदारांचं राजकीय भवितव्य टिकवणं, त्यांना राजकीय स्थिरता देणं हे एकनाथ शिंदे यांचं कर्तव्य आहे. एकनाथ शिंदे कोणाला दगा देणार नाहीत. परंतु, आम्हाला १२ जागा मान्य नाहीत. भाजपा आम्हाला इतक्या जागा देणार आणि आम्ही त्या घेणार असंही काही नाही. आम्ही केवळ १२ जागा घेऊ अशी काही स्थिती नाही. मागच्या वेळी आमचे १८ खासदार आले होते. त्यामुळे आम्हाला किमान १८ जागा मिळायलाच हव्यात. हवं तर उरलेल्या जागा राष्ट्रवादीला देता येतील, असं गजानन कीर्तिकर म्हणाले.
भाजपाने जागा द्यायच्या आणि आम्ही त्या घ्यायच्या अशी आमची अवस्था नाही. त्यांनी १२ जागा दिल्यात की नाही तेदेखील आम्हाला माहिती नाही. भाजपाने १२ जागा दिल्या म्हणजे आमच्यावर उपकार केले का? भाजपाने या गोष्टी चर्चा करून ठरवाव्या. आमच्या बाजूने कोण चर्चा करतंय, कोण निर्णय घेतंय हे काही आम्हाला माहिती नाही. आम्ही आमच्या जागांवर ठाम असायला पाहिजे. तसेच एकनाथ शिंदे यांच्याबरोबर जे १३ खासदार आले आहेत त्यांना एकनाथ शिंदे यांनी योग्य संरक्षण दिलं पाहिजे. आमच्याबरोबर दगाफटका व्हायला नको. शिवसेना काय भाजपाच्या दावणीला बांधलेली नाही. आम्ही तशी बांधू देणारही नाही. आमच्याबरोर दगाफटका होऊ नये, असंही गजानन कीर्तिकर म्हणाले.