शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा
मुंबई | राष्ट्रवादी पक्ष फुटीनंतर निवडणुक आयोगाने चिन्ह आणि पक्षनाव अजित पवार गटाला दिल्यानंतर तसेच आमदार अपात्रता निर्णय देखील लांबणीवर गेल्याने शरद पवार गट आता सगळ्यांनाच धक्का देण्याच्या तयारीत आहे. राष्ट्रवादी शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
शरद पवार गट काँग्रेस पक्षात विलीन होणार असल्याची बातमी समोर आली आहे. शरद पवार गटाचे नेते मंगलदास बांदल यांनी यावर भाष्य केलं आहे. शरद पवार आजच्या बैठकीत मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत. पक्षाला विलीन करण्याचा निर्णय हा राष्ट्रीय पातळीवरचा आहे. वरिष्ठ नेते याबाबतचा निर्णय घेतील. मात्र अशी चर्चा पवारांनी बोलावलेल्या बेठकीत सुरु आहे, असं मंगलदास बांदल म्हणाले.
हेही वाचा – व्हॅलेंटाईन्स डे १४ फेब्रुवारीलाच का साजरा केला जातो? काय आहे यामागची रंजक कथा
लोकसभा निवडणुकीसंदर्भात शरद पवारांनी पक्षातील सर्व आमदार आणि खासदारांची पुण्यात महत्वाची बैठक बोलवली आहे. या बैठकीला खासदार सुप्रिया सुळे,रोहित पवार,अमोल कोल्हे, अनिल देशमुख, श्रीनिवास पाटील, बाळासाहेब पाटील उपस्थित आहेत. पुण्यातील मोदी बागेत शरद पवारांच्या कार्यालयात बैठक सुरू आहे.
दरम्यान, काल कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला यांच्यासोबत कॉंग्रेसच्या बड्या नेत्यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे. त्यामुळे शरद पवार गट कॉंग्रेसमध्ये विलीन करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आता जोर धरू लागली आहे.