शरद पवारांना मोठा धक्का; अजित पवार गटाला पक्ष आणि चिन्ह मिळालं
अजित पवार गटाला पक्ष आणि चिन्ह मिळालं आहे. यामुळे शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने निर्णय जाहीर
![Election Commission's big blow to Sharad Pawar; NCP party and symbol Ajit Pawar group..!](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/02/sharad-pawar1-780x470.jpg)
पिंपरी : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फूट पडली होती. त्यामुळे खरा पक्ष कोणता याबाबतचा निकाल निवडणूक आयोगाकडे होता. हा निकाल आता लागला असून अजित पवार गटच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचं निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं आहे. पीटीआयने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाकडे गेलं आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे शरद पवार यांना मोठा धक्का बसला आहे.
जुलै महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली. तत्कालीन विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सत्ताधारी महायुतीबरोबर जात उपमुख्यमंत्री पदाचा कारभार स्वीकारला. त्यांच्याबरोबर काही आमदारही गेले. तसंच, जवळपास ७ मंत्र्यांनी त्यांच्याबरोबर मंत्रिपदाची शपथही घेतली. शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादीतही फूट पडल्याने हे प्रकरणही निवडणूक आयोगाकडे गेले. गेल्या सहा महिन्यांपासून निवडणूक आयोगाकडे राष्ट्रवादी काँग्रेस फुटीचं प्रकरण प्रलंबित होतं. गेल्या सहा महिन्यांत याप्रकरणी १० सुनावण्या निवडणूक आयोगाकडे झाल्या. या प्रत्येक सुनावणीत शरद पवार जातीने हजर होते.
निवडणूक आयोगाने काय म्हटलं आहे?
- अजित पवाराकंडील पक्ष खरा पक्ष आहे.
- पक्ष आणि चिन्ह अजित पवार वापरतील
- दोन खासदार अजित पवार गटाच्या बाजूने
- 5 आमदारांनी दोन्ही बाजूंनी पत्र दिलं
- उद्या 7 फेब्रुवारीपर्यंत पक्षाचं नाव आणि चिन्ह सूचवावं
- पक्षांतर्गत निवडणूक झाल्या नाहीत
अजित पवारांसोबत कोण?
– महाराष्ट्रातील 41आमदार
– नागालँडमधील 7आमदार
– झारखंड 1आमदार
– लोकसभा खासदार 2
– महाराष्ट्र विधानपरिषद 5
– राज्यसभा 1
शरद पवारांसोबत कोण?
महाराष्ट्रातील आमदार 15
केरळमधील आमदार 1
लोकसभा खासदार 4
महाराष्ट्र विधानपरिषद 4
राज्यसभा -3
पाच आमदारांनी व एका खासदाराने दोन्ही गटाच्या बाजूने प्रतिज्ञापत्र सादर केलं आहे.