उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत संजोग वाघेरेंचा ठाकरे गटात प्रवेश
![Sanjog Waghere's entry into the Thackeray group in the presence of Uddhav Thackeray](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/12/Sanjog-Waghere-1-780x470.jpg)
मुंबई : पिंपरी-चिंचवडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष, माजी महापौर संजोग वाघेरे यांनी आज ठाकरे गटात प्रवेश केला आहे. या पक्षप्रवेशासाठी उद्धव ठाकरे, संजय राऊत हे उपस्थित होते. उद्धव ठाकरेंनीच संजोग वाघेरेंना शिवबंधन बांधून त्यांच्या पक्षप्रवेशावर शिक्कामोर्तब केलं. संजोग वाघेरेंचा हा पक्षप्रवेश उपमुख्यमंत्री अजित पवार गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
पक्षप्रवेशानंतर संजोग वाघेरे म्हणाले, करोनाच्या काळात उद्धव ठाकरेंच्या मार्गदर्शनामुळेच आपण या विषाणूला रोखू शकलो. तेव्हाच मी उद्धव ठाकरेंच्या कामगिरीने प्रभावित झालो होतो. संजय राऊतही दररोज पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आपल्याला दिशा देण्याचं काम करत असतात.
या मंडळींनी (सत्ताधारी) आता संविधानाच्या बाबतीत चुकीची भूमिका घेतली आहे. अनेक वेगळे मुद्दे काढले आहेत. या सगळ्याचा विचार आमच्या कार्यकर्त्यांसह आम्ही केला. त्यानंतर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्णय आम्ही घेतला. उद्धव ठाकरे हो म्हणतील का? याविषयी शंका वाटत होती. पण इथे त्यांना भेटलो, तेव्हा अत्यंत मितभाषी असं व्यक्तिमत्व आम्हाला पाहायला मिळालं. आता ते देतील ती जबाबदारी पार पाडण्यासाठी आम्ही सज्ज आहोत, असं संजोग वाघेरे म्हणाले.
हेही वाचा – इंडियन मेडिकल असोसिएशन आणि युवा परिवर्तन तर्फे मोफत तपासणी शिबीर संपन्न
उद्धव ठाकरे म्हणाले, मला भेटल्यावर तुम्ही भावूक झालात, मला भावूक आणि घाऊक याचा फरक कळायला लागला आहे. काहीजण भावूक आहे, जे भावनेला महत्त्व देतात, ज्यांच्यात संवेदना आहेत, ते निष्ठेनं भगव्यासोबत आहेत. काहीजण घाऊक आहेत, त्यांना आता खोक्यामध्ये बंद करयाच आहे. तसं पाहिलं तर मावळ मतदारसंघ जेव्हापासून निर्माण झाला, तेव्हापासूनच शिवसेना जिंकत आली आहे. आधी बाबर होते. त्यानंतर मी शब्द दिला होता, म्हणून जे आता गद्दार झालेत, त्यांना उमेदवारी दिली. म्हणजे, असं काही नव्हतं की, शिवसेनेकडे उमेदवार नव्हता. आता त्यांनी गद्दारी केली, गद्दार आणि स्वाभिमानी हा संजोग वाघेरे आणि त्या गद्दारांमध्ये आहे. आज तुम्ही सगळे शिवसेनेत आलात, काय असं शिवसेनेमध्ये आहे आता की तुम्ही येताय? सत्ता जी होती, ती पुन्हा येणारच आहे, त्याबाबत दुमत नाही. पण सत्ता त्यांनी हिसकावून घेतली, गद्दारी केली.
आज तुम्ही सर्वांनी पक्षप्रवेश केला. इथे सत्ता नसताना सत्ता आणण्याच्या जिद्दीनं तुम्ही इथे आलात. काही आपली खुर्ची टिकवण्याच्या लाचारीनं गेलेले आहेत, हाच स्वाभिमान आणि लाचारीतला फरक आहे. जिथे सत्ता असते तिथे, गर्दीचा ओघ असतो. पण इथे वेगळं आहे. मला तुमचा उत्साह सांगतोय की, तिथे प्रचाराला येण्याची गरज नाही, आजच तिथे मावळमध्ये भगवा फडकला आहे. हा मावळ मतदारसंघ वेगळा आहे. तरी मी प्रचाराला तर येईलच. सातत्यानं विचारलं जातं की, इंडिया पंतप्रधान पदासाठी पर्याय कोण? पण आमच्याकडे पंतप्रधान पदांसाठी खूप पर्याय आहेत, पण भाजपकडे कोण आहेत? आणि जे आहेत, त्यांचं कतृत्त्व आपण गेली दहा वर्ष पाहिलंच आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.