मनोज जरांगे पाटलांचा देवेंद्र फडणवीसांना इशारा; म्हणाले, काड्या करत राहिले तर..
मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिवाळी अधिवेशनात अंतरवाली सराटीत झालेल्या लाटीचार्जबाबत दिलेल्या लेखी उत्तराने नव्या वादाला तोंड फुटले आहे. दरम्यान, यावरून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी फडणवीसांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
मनोज जरांगे पाटील म्हणाले, देवेंद्र फडणवीस काड्या करत राहिले, तर पुढं काय काय होते, ते पाहा. तुमचा डाव उधळून लावणार आहे. तरच, मराठ्याचं असल्याचं सांगणार.
देवेंद्र फडणवीसांवर टीका केली तर आम्ही सहन करणार नाही, असा इशारा भाजपा आमदार नितेश राणेंनी जरांगे पाटलांना दिला. यावर ते म्हणाले, मराठ्यांनी सावध राहावे. कारण, देवेंद्र फडणवीसांचा मराठ्यांविषयी गरळ ओकण्याचं अंदाज दिसतोय. बरेचशे नेते आता जागे होत आहेत. मराठ्यांनाच मराठ्याविरोधात अंगावर घालण्याचं काम चालू आहे. पण, किती जणांना अंगावर घालणार हे मी पाहतो. आम्ही शांत आहोत आणि राहुद्या.
हेही वाचा – मनसेचं लोणावळ्यात रेल रोको आंदोलन! पुण्याहून मुंबईकडे जाणारी डेक्कन क्विन रोखली
देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
जालना जिल्ह्यातील सदर आंदोलनात हिंसक जमावाकडून करण्यात आलेल्या दगडफेकीत ७९ पोलीस अधिकारी आणि अंमलदार जखमी झाले आहेत. अंतरवाली सराटीत पोलिसांनी बचावात्मक पद्धतीनं बळाचा वाजवी वापर केला. त्यात ५० आंदोलक जखमी झाले, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.