अहो आश्चर्यमः महाराष्ट्र शासनाच्या भ्रुण प्रत्यारोपण प्रयोगशाळेत जन्माला आले ब्राझीलीयन गीर जातीचे वासरू
महाराष्ट्र पशुधन विकास मंडळ, नागपूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सतिष राजू यांची माहिती
![Oh wonder, Maharashtra, government, embryo transplantation, laboratory, born, Brazilian, geer, breed calves,](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/10/Vasaru-780x470.jpg)
पुणेः पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र शासन अंतर्गत महाराष्ट्र पशुधन विकास मंडळ, नागपूर संचलित बाहय फलन व भ्रुण प्रत्यारोपण प्रयोगशाळा (ET-IVF Lab) वळू माता प्रक्षेत्र, ताथवडे, पुणे येथे भ्रुण प्रत्यारोपणाच्या सहाय्याने ब्राझीलीयन वंशावळ असलेल्या गीर जातीच्या मादी वासराचा जन्म झाल्याची माहीती डॉ. सतिष राजु, मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र पशुधन विकास मंडळ, नागपूर यांनी दिली.
सन 2017-18जिल्हा वार्षिक विकास योजना पुणे निधीतून भ्रूण प्रत्यारोपण प्रयोगशाळेची स्थापना करण्यात आली आहे. जिल्हातील व परीसरातील देशी गाई व संकरीत गाईमध्ये अनुवंशिक सुधारणा करून सदर उच्च वंशावळ असणाऱ्या पशुधानाची संख्या जलद वाढवण्याच्या उद्देशाने सदर प्रयोगशाळेची स्थापना करण्यात आली आहे.
सदर प्रयोगशाळेत एप्रिल 2021 पासून पंढरपुरी म्हैस व फ्रिजवाल, जर्सी, गीर, सहीवाल गाईमध्ये बाह्य भ्रूण निर्मिती व भ्रूण प्रत्यारोपणाचे काम डॉ. जवणे व्ही. बी. व डॉ. सांगळे बी.पी. पविअ यांच्या टीमद्वारे केले जात असून सदर प्रयोगातून यशस्वरीत्या वासरू जन्माला आले आहे. आतापर्यंत हो. फ्रि संकरीत, सहीवाल, जर्सी व गीर व पंढरपुरी म्हैस जातीचे असे एकूण 14 वासरे जन्माला आले असल्याने मा. डॉ, हेमंत वसेकर, आयुक्त पशुसंवर्धन, महाराष्ट्र शासन, पुणे यांनी अभिनंदन केले आहे.
सदरच्या तंत्रज्ञानामध्ये गाईच्या बिजांड कोषातून स्त्री बीज काढून त्यांना प्रयोगशाळेत परीपक्व करून त्यांचे फलन केले जाते व तद्ननंतर विशिष्ट यंत्रामध्ये सदरचे फलित स्त्री बीज 7 दिवस ठेवुन त्रतुचक्राचे नियमन केलेल्या गाईच्या गर्भशयामध्ये सदर 7 दिवसाचे भ्रुण प्रत्यारोपीत केले जाते. या तंत्रज्ञानाचा वापर करून भ्रूण प्रत्यारोपण प्रयोगशाळा (ET-IVF Lab) वळू माता प्रक्षेत्र, ताथवडे, पुणे येथे सदर गीर वंशावळीच्या वासराचा जन्म झाला असल्याचे डॉ. हरिश्चंद्र अंभ्यंकर, प्रक्षेत्र व्यवस्थापक, वळु माता प्रक्षेत्र, ताथवडे, पुणे यांनी सांगितले.
चंद्रकांत बऱ्हेकर, संचलित तनमन डेअरी फॉर्म येथील 50 टक्के ब्राझीलीयन वंशावळ असलेल्या गीर गाईतून स्त्री बीज संकलन करून सदर स्त्री बीज 100 टक्के ब्राझीलीयन वंशावळ असलेल्या (Espanto) गीर जातीच्या वळूच्या विर्याने फलित केले होते. सदर तयार 7 दिवसाचे भ्रूण वळू माता प्रक्षेत्र, ताथवडे येथील फ्रिजवाल जातीच्या गाईच्या गर्भाशयात सोडल्यानंतर सदर 75 टक्के ब्राझीलीयन वंशावळ असलेल्या गीर जातीच्या मादी वासराचा यशस्वीरीत्या जन्म झालेला आहे. ब्राझीलीयन वंशावळ असलेल्या गीर जातीच्या गाईचे एका वेतातील दूध 12000 ते 16500 किलो एवढे असल्याने भारतातही आता 40 ते 50 लि. प्रती दिन दूध देणाऱ्या गीर गाईची वंशावळ तयार करण्यासाठी हा महत्वाचा टप्पा असून या तंत्रज्ञानाच्या यशस्वी चाचणीमुळे गीर जातीमध्ये अनुवंशिक सुधारणा करण्याच्या हेतूने हे एक महत्वपूर्ण पाऊल आहे.
– डॉ. जवणे विष्णु भगवान
प्रमुख भ्रुण प्रत्यारोपण प्रयोगशाळा, वळुमाता प्रक्षेत्र, ताथवडे, पुणे