कैद्यांसाठी स्वातंत्र्याची पहाट! स्वातंत्र्यदिनी राज्यातील १८६ कैद्यांची कारागृहातून होणार सुटका
![186 prisoners of the state will be released from jail on Independence Day](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/08/186-prisoners-released-from-jail--780x470.jpg)
मुंबई : यंदाच्या वर्षी १५ ऑगस्टला देशाचा ७६ वा स्वातंत्रदिन पार पडणार आहे. स्वातंत्रदिनानिम्मित देशभरात उत्साहाचं आणि प्रसन्नमय वातावरण असतं. यानिमित्ताने देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. अशातच स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त राज्याच्या कारागृहातील विशिष्ट प्रवर्गाच्या कैद्यांना तीन टप्प्यामध्ये विशेष माफी देण्यात येणार आहे. १५ ऑगस्टला या माफी योजनेचा तिसरा टप्पा पार पडणार आहे.
या तिसऱ्या टप्प्यात राज्यातील १८६ कैद्यांना विशेष माफी देऊन कारागृहातून मुक्त करण्यात येणार आहे. याबतचे सरकारने आदेश देखील काढले आहेत. यासंदर्भाची केंद्रीय गृह सचिवाकडून माहिती देण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यामध्ये म्हणजेच १५ ऑगस्ट २०२२ रोजी २०६, दुसऱ्या टप्प्यामध्ये म्हणजेच २६ जानेवारी २०२३ रोजी १८९ तर तिसऱ्या टप्प्यामध्ये म्हणजेच येत्या १५ ऑगस्ट २०२३ रोजी १८६ कैद्यांना विशेष माफी देण्यात येणार आहे.
हेही वाचा – ‘नवीन इंजेक्शन घेतल्यामुळेच नवाब मलिक सुटले’; संजय राऊत
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त आयोजित केलेल्या माफी योजनेचा उद्देश हा कैद्यांमध्ये कारागृहातील शिस्त आणि आचरण निश्चित करणे असा आहे. तसेच कारागृहातून प्रोत्साहन स्वरूपात लवकरात लवकर सुटका करणे हा आहे. या माफी योजनेमुळे कैद्यांना गुन्हेगारी जीवन सोडून देशाचे जबाबदार नागरिक बनण्याकरीता प्रोत्साहन मिळणार आहे.