‘..तर १०० टक्के अजित पवार मुख्यमंत्री होतील’; मंत्रीमंडळातील मंत्र्याचं विधान
मुंबई : अजित पवार यांनी बंडखोरी करत शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला. अजित पवारांबरोबर शपथ घेतलेले ८ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. अजित पवारांना उपमुख्यमंत्रीपदासह अर्थखातंही मिळालं आहे. दरम्यान, अजित पवार राज्याचे मुख्यमंत्री होतील, अशी चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रावादीचे नेते मंत्री अनिल पाटील यांनी सूचक विधान केलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी दोन दिवसांपूर्वी अजित पवार मुख्यमंत्रीपदाबाबत ट्वीट केलं आहे. मी अजित अनंतराव पवार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की..! लवकरच अजितपर्व..असं मिटकरींनी या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. यावरून आता मंत्री अनिल पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा – धक्कादायक! एसपी अधिकाऱ्याने गोळी झाडून पत्नी-पुतण्याला संपवलं, स्वत:ही केली आत्महत्या
अनिल पाटील म्हणाले की, हे अमोल मिटकरी एकटे म्हणत नाहीयेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गल्लीपासून दिल्लीच्या कार्यकर्त्यांना, नेत्यांना अजित पवार मुख्यमंत्री झाले पाहिजेत. ही आमची सगळ्यांचीच इच्छा आहे. पण त्याबरोबर १४५ आमदारांचा आकडा गाठावा लागतो. तो गाठला गेला, तर १०० टक्के अजित पवारच राष्ट्रवादी काँग्रेसकडून मुख्यमंत्री होतील. आत्ता तो आकडा आमच्याकडे नाहीये. त्यामुळे शिंदे सरकारच्या पाठिशी आम्ही सगळे आहोत.