चिंबळीतील हातभट्टीवर पोलिसांचा छापा ; 11 लाखांचे साहित्य जप्त
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/09/hatbhatti-karvai.jpg)
पिंपरी ( महा ई न्यूज ) – आळंदी हद्दीतील चिंबळी येथे गुन्हे शाखेने हातभट्टीवर छापा टाकून दारू बनविण्यासाठी लागणारे 60 हजार लिटर रसायण, 1190 लिटर हातभट्टी, 75 किलो तुरटी, 10 किलो गुळ, 35 मोकळे कॅन, दोन पाण्याच्या विद्युत मोटारी, 5 भट्टीला हवा मारण्याचे इलेक्ट्रीक भाते, लाकडी सरपन असे 11 लाखांचे साहित्य जप्त केले. ही कारवाई शुक्रवारी रात्री अकराच्या दरम्यान करण्यात आली.
याप्रकरणी हातभटीचा मालक दयाराम नाथाजी चौधरी (वय 35, रा. संजय गांधीनगर बो-हाटेवाडी, मोशी), सचिन धोंडू तेली (वय 20, रा. कोकरे मंडप विद्यानगर, चिंचवड), संदीप पांडुरंग अभंगकर (वय 28, रा. घरकुल सोसायटी, चिखली) या तिघांना अटक केले आहे.
गुन्हे शाखेचे पथक गस्तीवर असताना चिंबळी फाटा येथून एका मारूती मोटारीतून हातभट्टी दारूची वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून आरोपी तेली व अभंगकर यांना ताब्यात घेतले. आरोपींकडे चौकशी केल्यानंतर चिंबळी येथील नदीकाठी असलेल्या दारूच्या भट्टीवरून दारू आणल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून कारवाई केली.