‘सगळी पदे उपभोगल्यानंतर दगा..’; ठाकरे गटाचा नीलम गोऱ्हे यांच्यावर हल्लाबोल
![Anil Parab said that it is not proper to betray the party after enjoying all the posts](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/07/Neelam-Gorhe-and-uddhav-thackeray-780x470.jpg)
मुंबई : विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नीलम गोऱ्हे यांनी पक्षात प्रवेश केला आहे. दरम्यान, यावरून ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी टीका केली आहे.
अनिल परब म्हणाले की, शिवसैनिकांच्या मेहनीतवर नीलम गोऱ्हे यांनी चार वेळा आमदारकी भोगली. ज्या शिवसैनिकांच्या जोरावर ही सगळी पदे भोगली, त्यांना किती यातना होत असतील. आपल्याला काही मिळत नाही, म्हणून पक्ष सोडणारे भरपूर आहेत. पक्षाचे लाखो कार्यकर्ते उद्धव ठाकरेंबरोबर आहेत. संधीसाधू लोक गेले असतील, तर त्याची जागा आम्ही भरून काढू. पण, सगळी पदे उपभोगल्यानंतर पक्षाला दगा देणं आणि वार करणं हे उच्च पदाधिकाऱ्यांना शोभत नाही.
हेही वाचा – उद्धव ठाकरेंना मोठा धक्का! निलम गोऱ्हेंचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश
नीलम गोऱ्हे नेमकं काय म्हणाल्या?
१९९२ नंतर एनडीए आणि यूपीए अशा आघाड्या झाल्या. १९९८ साली मी शिवसेनेत प्रवेश केला. मला शिवसेनेत फार चांगलं काम करता आलं. सध्या निवडणूक आयोग व सर्वोच्च न्यायालयाने एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पक्षच अधिकृत शिवसेना असल्याचा स्पष्ट निकाल दिला आहे. केंद्र सरकारने अनेक सकारात्मक पावलं उचलली आहेत. नरेंद्र मोदी व अमित शाह यांची अनेक मुद्द्यांवर चांगली इच्छाशक्ती दिसत आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या भूमिकांचा सन्मान करून केंद्रातील व राज्यातील सरकार काम करत आहे, असं नीलम गोऱ्हे म्हणाल्या.