शिवजयंती व महापुरुषांच्या जयंतीसाठी भक्तीशक्ती येथील जागा कायमस्वरुपी द्या – एकनाथ शिंदे
![Shiv Jayanti, Mahapurush, Jayanti, Bhaktishakti, Give place forever, Eknath Shinde,](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/06/Maruti-Bhapkar-780x470.png)
पिंपरी :
युगप्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती उत्सव साजरी होणारी भक्ती शक्ती समुहशिल्पालगतची बिल्डरांना विक्री केलेली जागा शिवजयंती समितीला देऊन संबधित बिल्डरला दुसरी पर्यायी जागा द्यावी असे आदेश पीएमआरडीएचे आयुक्त राहुल महिवाल यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.
पिंपरी चिंचवड शहरात येताना भक्ती शक्ती समुहशिल्पालगतच्या पीएमआरडीएच्या जागेत शहरातील सर्वात मोठी युवप्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज यांची शिवजयंती, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीची भूखंड विक्री प्रक्रिया रद्द करून हा भूखंड जयंती उत्सव व इतर सर्व सार्वजनिक उपक्रमासाठी कायमस्वरूपी राखीव ठेवण्यात यावी. या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांच्या नेतृत्वाखाली समितीच्या वतीने थेरगाव येथे खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या मध्यस्थीने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट समितीच्या वतीने घेण्यात आली.
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पीएमआरडी आयुक्त राहुल महिवाल, मनपा आयुक्त शेखर सिंह, आमदार महेश लांडगे यांच्यासमोर मारुती भापकर यांनी मुख्यमंत्री महोदय आपण महात्मा बसवेश्वर पुतळ्याचे अनावरण जेथे करणारसाठी जाणार आहात त्या जागेलगत शहरातील सर्वात मोठी शिवजयंती, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती पिंपरी चिंचवड महानगरपालिका व समितीच्या वतीने साजरी होते. या कार्यक्रमासाठी दरवर्षी आठ ते दहा हजार लोक उपस्थित असतात. तसेच ही जागा जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या पालखी मार्गाचा आहे. त्यावर मुख्यमंत्र्यांनी भापकर थांबवत मग झाले काय ? असा प्रश्न केला असता.
भापकर यांनी मुख्यमंत्र्यांच्या शेजारी उभे असणारे राहुल महिवाल यांच्याकडे बोट दाखवून यांनी ही जागा लिलाव करून विक्री केली आहे. त्यामुळे आमच्या सर्व महापुरुषांचे कार्यक्रम बंद होणार आहेत. हा निर्णय रद्द करावा, इतर पर्याय विचार करून ही जागा कायमस्वरूपी राखीव ठेवावी अशी आमची मागणी आहे. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तत्काळ श्री महिवाल यांना सर्व पर्यायांचा विचार करून संबधित बिल्डरास दुसरी जागा द्यावी आणि शिवजयंती जिथे साजरी होत होती तिथेच उत्साहाने साजरी होईल यात सकारात्मक मार्ग काढावा असा आदेशच केला.
यावेळी शिष्टमंडळात मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सवचे अध्यक्ष संजय ससाने, काँग्रेस पक्षाचे नरेंद्र बनसोडे, शिवसेना ठाकरे गटाचे युवराज कोकाटे, कष्टकऱ्यांचे नेते काशिनाथ नखाते, शिवाजी साळवे, मराठा सेवा संघाचे प्रकाश जाधव, छावा युवा महासंघाचे अध्यक्ष धनाजी यळकर पाटील, संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष सतीश काळे, भाउसाहेब अडागळे उपस्थित होते.