RBI ने २००० रूपयांच्या नोटा वितरणातून काढल्या; अर्थराज्यमंत्री म्हणाले..
![Bhagwat Karad said that since RBI is an autonomous body, it often takes such decisions](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/05/bhagwat-karad-780x470.jpg)
मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) ने २००० रूपयांच्या नोटा वितरणातून काढून घेण्याच्या निर्णयाची घोषणा केली. तसेच ३० सप्टेंबर पर्यंत नागरिकांनी या नोटा बँकेत जमा कराव्या असे RBI ने म्हटलं आहे. दरम्यान, यावर मोदी सरकारमधील केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
भागवत कराड म्हणाले, रिझर्व्ह बँकेकडून एका निर्णयाची घोषणा करण्यात आली. यानुसार चलनातील २००० रूपयांच्या नोटा बँकेत जमा करण्यास सांगण्यात आलं आहे. त्यासाठी ३० सप्टेंबर ही शेवटची तारीख दिली आहे. म्हणजे नोटा बदलून घेण्यासाठी ६ महिन्याचा वेळ आहे.
हेही वाचा – २ हजार रुपयांची नोट चलनातून माघारी घेण्याचा RBIचा निर्णय, ३० सप्टेंबरपर्यंत वैध राहणार
RBI ही स्वायत्त संस्था असल्याने त्यानी जनतेला आवाहन केलं आहे की, आपल्याकडे असणाऱ्या २००० रूपयांच्या सर्व नोटा बँकेत जमा करा. एकावेळी २० हजार रूपयांच्या नोटा जमा करता येतील. RBI स्वायत्त संस्था असल्याने असे निर्णय अनेकदा घेते, असं भगवत कराड म्हणाले.
यावेळी सर्वसामान्य लोकांचे हाल होणार नाहीत. कारण पुरेसा ६ महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे. याशिवाय आता हातगडीवाल्यापासून उद्योजकांपर्यंत प्रत्येकाला डिजीटल व्यवहार माहिती झाले आहेत. त्यामुळे बँकेतील व्यवहार डिजीटल माध्यमातून होत आहे. सर्वांना डिजीटल व्यवहार माहिती आहेत, ते हे व्यवहार शिकले आहेत. बाकी ज्यांना बँकेत जाऊन पैसे जमा करायचे आहेत ते कोणत्याही बँकेत जाऊन पैसे जमा करू शकतात, असंही भागवत कराड म्हणाले.