‘नकली शिवसेना! ढोंगी हिंदूत्व! एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे वैरी’; संजय राऊतांचा हल्लाबोल!

मुंबई : कर्नाटक निवडणुकींचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. १० मे रोजी मतदान होणार आहे. यासाठी महाराष्ट्रातील अनेक नेते प्रचारासाठी कर्नाटकात तळ ठोकून आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील प्रचारासाठी कर्नाटकात दाखल झाले आहेत. यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ट्वीट करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कर्नाटकात भारतीय जनता पक्षाच्या प्रचारास गेले आहेत. शिवसेना आमचीच.. बाळासाहेबांच्या विचारांचे खरे वारसदार आम्हीच असा डांगोरा ते रोज पिटत आहेत. आता काय? कर्नाटकचे मुख्यमंत्री बॉम्माई म्हणतात, महाराष्ट्र एकीकरण समितीचे लोकं उचापती आहेत त्यांना आम्ही धडा शिकवू..आणि शिंदे त्याच बॉम्माईच्या पखाली वाहत आहेत. शिंदे व त्यांची टोळी सीमा भागात फिरकली नाही. उलट एकीकरण समितीच्या विरोधातील भाजपा उमेदवारांना खोके पाठवून मराठी माणसांच्या पाठीत खंजीर खुपसला, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.
हेही वाचा – ११ ते १३ मे दरम्यान फडणवीसांना धक्का बसणार? सुषमा अंधारेंचा मोठा दावा
सीमा भागातील एकीकरण समितीचे उमेदवार पराभूत व्हावेत म्हणून शिंदे यांनी जोर लावला आहे. नकली शिवसेना! ढोंगी हिंदूत्व! हे तर महाराष्ट्राचे वैरी. बाळासाहेबांनी या कृत्या बद्दल शिंदे यांची शिवसेनेतून हकालपट्टीच केली असती.. एकशे पाच हुतात्म्यांशी ही बेइमानी आहे. महाराष्ट्र ही गद्दारी लक्षात ठेवील, असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.





