पुण्याची लोकसभा पोटनिवडणूक लवकरच!
मतदान केंद्रांची पाहणी करण्याचे आदेश
पुणे : दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या निधनामुळे पुण्यातील लोकसभेची खासदार पदाची जागा रिक्त झालेली आहे. या जागेवर नेमकी निवडणूक कधी होणार याबाबत संभ्रमावस्था आहे. मात्र गुरुवारी पुणे लोकसभा पोटनिवडणुकीसाठी प्रशासनाला मतदार केंद्राची पाहणी करण्याचे आदेश प्रशासनाकडून प्राप्त झाले आहे. त्यामुळे लोकसभेसाठी प्रशासनाकडून तयारी सुरु झाल्याची चर्चा रंगली आहे.
प्रशासनाला मिळालेल्या आदेशानुसार, शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील सर्व नोडल अधिकारी / पर्यवेक्षक यांना आदेशित करण्यात आले आहे की, गिरीष बापट यांचे निधनाने रिक्त झालेल्या जागी लोकसभा पोट निवडणूक २०२३ जाहिर होण्याची शक्यता आहे.
यास्तव सर्व नोडल अधिकारी यांनी आपले यादीभागातील मतदान केंद्रावर तात्काळ भेट देऊन सदर मतदान केंद्राचे अक्षांश रेखांशासह फोटो काढावेत तसेच सदर मतदान केंद्र सुस्थितीमध्ये आहेत किंवा नाही याची खात्री करावी. सदर मतदान केंद्रावर सर्व सुविधा आहेत किंवा नाही याबाबत लेखी अहवाल तात्काळ कार्यालयास सादर करावा असे सांगण्यात आले आहे.
सदर कामकाज करणेस जाणिवपूर्वक टाळाटाळ केलेबद्दल अधिकाऱ्यांवर लोकप्रतिनिधीत्व अधिनियम १९५० चे कलम ३२ (२) नुसार शिस्तभंगाची कार्यवाही करणेत येईल असे सूचित करण्यात आले आहे.