‘माझ्या आयुष्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याइतकच शरद पवारांना स्थान’; संजय राऊत
![Sanjay Raut said Sharad Pawar has the same place in my life as Shiv Sena chief Balasaheb Thackeray](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/04/sanjay-raut-and-sharad-pawar-780x470.jpg)
बारामती : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी कर्जत-जामखेड येथील पत्रकार संमेलनाला हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी मी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याइतकच शरद पवार यांना स्थान देतो, असं वक्तव्य केलं आहे.
संजय राऊत म्हणाले की, मी माझ्या आयुष्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याइतकच शरद पवारांना स्थान देतो. नक्कीच मला बाळासाहेब ठाकरे यांनी मोठं केलं, मला या क्षेत्रात उभं केलं. पण शरद पवार देखील माझ्यासाठी आधारस्थंभ आहेत आणि जे तुम्ही बोलताय तशा गाठीभेटी शरद पवार घेत नाहीत. त्या दिवशी मी शिवसेना भवनात होते. तिथे मी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद पाहिली आणि तिथून मी शरद पवारांच्या घरी गेलो.
मी त्या दिवशी पत्रकार परिषद आटोपल्यानंतर शरद पवारांचं निवासस्थान असलेल्या सिल्वर ओक येथे गेलो. तिथे मी माध्यामांना मुलाखती देखील दिल्या. मला पत्रकारांनी विचारलं, कशासाठी आला आहात, मी त्यांना म्हणालो, सत्तास्थापनेसाठी आलोय. सरकार बनवायला आलो आहे. त्याचबरोबर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील सांगितलं होतं की, आमच्यापुढे सर्व पर्याय उपलब्ध आहेत, असंही संजय राऊत म्हणाले.