खासदार राजू शेट्टी विरोधात हातकणंगलेतून लोकसभा लढणार – कृषीमंत्री सदाभाऊनी फुंकले रणशिंग
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/09/FB_IMG_1536341221884.jpg)
कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची घोषणा
देवर्डे ग्रामपंचायतीच्या विविध विकास कामांचे उद्घाटन
वाळवा ( महा ई न्यूज ) – हातकणंगले लोकसभा मतदार संघात राष्ट्रीय पेयजल योजनेतून सुमारे 250 कोटींचा निधी विविध गावांना दिला आहे. ती सर्व कामे युध्दपातळीवर सुरु आहेत. त्यामुळे एकही गाव विकासापासून वंचित राहणार नाही, असे सांगत आगामी हातकणंगले लोकसभा मतदारातून निवडणूक लढविणार असल्याची घोषणा कृषी, पणन व पाणीपुरवठा राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केली.
देवर्डे ( ता.वाळवा ) येथील नव्याने बांधलेल्या ग्रामपंचायत इमारत, गाव आेढ्यावरील पूलासह विविध विकास कामांच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री डॉ .विनयरावजी कोरे, कृषी, पणन व पाणीपुरवठा राज्यमंत्री नाम सदाभाऊ खोत, आमदार शिवाजीराव नाईक, सरपंच रेखा पाटील, ज्येष्ठ मार्गदर्शक केरूदादा पाटील, श्रीनिवास डोईजड, अरविंद बुद्रुक, युवक नेते दिपक पाटील, संजय पाटील, विलास पाटील, धर्मेद्र पाटील, गटविकास अधिकारी शशिकांत शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
खाेत म्हणाले की, वाळवा-शिराळा मतदार संघातील विविध गावांना जलयुक्त शिवार, मागेल त्याला शेततळे, ठिंबक सिंचन, पाणी पुरवठा योजनांसह रस्त्यांच्या कामांना निधी उपलब्ध करुन दिला आहे. तसेच एफआरपीनूसार 12 टक्के साखर उता-याला कारखानदारांना 3 हजार 300 रुपये देण्यासाठी प्रयत्न करु, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. माजी मंत्री विनय कोरे, आमदार शिवाजीराव नाईक यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक युवा नेते दिपक पाटील यांनी केले. तर सुत्रसंचालन प्रताप पाटील यांनी केले.