छत्रपती संभाजीनगरात आज मविआची जाहीर सभा

mahavikas aghadi : छत्रपती संभाजीनगरमध्ये आज महाविकास आघाडीची संयुक्त सभा होणार आहे. या सभेला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अजित पवार, नाना पटोले, बाळासाहेब थोरात यांच्यासह आघाडीचे नेते उपस्थित राहणार आहेत. संभाजीनगरमध्ये नुकत्याच झालेल्या तणावग्रस्त वातावरणानंतर महाविकास आघाडीची ही पहिलीच सभा होत आहे. त्यामुळं या सभेकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलं आहे.
आजच्या सभेला उद्धव ठाकरे, अजित पवार, नाना पटोले, अशोर चव्हाण, बाळासाहेब थोरात, अंबादास दानवे, चंद्रकांत खैरे यांच्यासह आघाडीचे नेते पदाधिकारी उपस्थित असणार आहेत.
आजच्या सभेला पोलिस प्रशासनाने सशर्त परवानगी दिली आहे. त्यामध्ये कार्यक्रमाच्या वेळेत आणि ठिकाणात कोणत्याही प्रकारचा बदला करू नये, कार्यक्रमाचे वेळी कोणत्याही प्रकारे कोणताही रस्ता रहदारीस बंद करण्यात येऊ नये. तसेच वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही, याची दक्षता घ्यावी. सभेत सहभागी होणाऱ्या नागरिकांनी स्वंयशिस्त पाळावी, सभेला येताना आणि परत जाताना कोणीही आक्षेपार्ह घोषणाबाजी, हुल्लडबाजी, असभ्य वर्तन करणार नाही याची दक्षता घ्यावी. सभास्थानी कमाल मर्यादेपेक्षा जास्त लोकांना निमंत्रित करू नये, यासह अन्य अटीवर सभेला पोलिसांनी परवानगी दिल्याची माहिती मिळाली आहे.





