काँग्रेस-राष्ट्रवादी, डाव्या पक्षांची उद्या महाराष्ट्र बंदची हाक
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/09/fule-increse.jpg)
इंधन दरवाढीला विरोध, शिवसेना, मनसेलाही पाठिंब्याचे आवाहन
केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेलची केलेली प्रचंड दरवाढ, गगनाला भिडलेली महागाई, त्याचा निषेध करण्यासाठी काँग्रेसने सोमवारी भारत बंदची हाक दिली आहे. त्याचाच एक भाग म्हणून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, शेकाप, पीपल्स रिपब्लिकन पक्ष इत्यादी पक्षांनी महाराष्ट्र बंद करण्याचे जाहीर केले आहे.
केंद्र सरकारच्या विविध धोरणांच्या विरोधात भूमिका घेणाऱ्या शिवसेना व मनसेनेही या बंदमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन निरुपम व मलिक यांनी केले. शिवसेनेने बंदमध्ये सहभागी व्हावे, यासाठी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण त्या पक्षाच्या नेत्यांशी बोलणार आहेत, अशी माहिती निरुपम यांनी दिली.
केंद्रातील भाजप सरकारच्या जनविरोधी धोरणाचा निषेध म्हणून पुकारण्यात आलेल्या या बंदमध्ये सर्व विरोधी पक्षांनी, कामगार संघटना, टॅक्सी, रिक्षाचालक संघटना, दुकानदार, व्यापारी यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी शनिवारी संयुक्त पत्रकार परिषदेत केले. बंदमधून दूध पुरवठा, सर्व रुग्णालये, औषधांची दुकाने व शाळा-महाविद्यालयांना वगळण्यात आले आहे. शाळा-महाविद्यालये स्वत:हून बंदमध्ये सहभागी होणार असतील, तर त्यांचे स्वागत आहे, असे निरुपम म्हणाले.
भाजप सरकारच्या या जनविरोधी धोरणाचा निषेध म्हणून काँग्रेसने सोमवारी (१० सप्टेंबर) भारत बंदची हाक दिली आहे. त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्रात आणि मुंबईत हा बंद यशस्वी करण्याचे आवाहन निरुपम व मलिक यांनी केले आहे. या बंदमध्ये मुंबईतील दुकानदार, व्यापारी, पेट्रोल पंपचालक, रिक्षा, टॅक्षीचालक संघटना, यांनी सहभागी व्हावे, यासाठी त्यांच्या संघटनांशी चर्चा सुरू आहे, असे निरुपम यांनी सांगितले.सोमवारी सकाळी दहा वाजल्यापासून बंदला सुरुवात होईल. बंद पूर्णपणे शांतते पार पडेल, अशी ग्वाही त्यांनी दिली. बंदमध्ये विविध क्षेत्रांतील कामगार संघटना सहभागी होतील, अशी माहिती महाराष्ट्र संयुक्त कामगार संघटना कृती समितीचे निमंत्रक विश्वास उटगी यांनी दिली. बँक कर्मचारी या बंदमध्ये सहभागी होणार नाहीत, मात्र बंदला पाठिंबा म्हणून त्या दिवशी कर्मचारी निदर्शने करतील, असे महाराष्ट्र बॅंक कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस देविदास तुळजापूरकर यांनी सांगितले.
व्यापारी संघटनेचा सहभाग नाही
काँग्रेस व अन्य पक्षांनी पुकारलेल्या भारत बंदमध्ये सहभागी होणार नाही, असे अखिल भारतीय व्यापारी महासंघाचे अध्यक्ष बी.सी.भारतीय आणि सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल यांनी जाहीर केले आहे.
बंदमधून यांना वगळळे
- दूधपुरवठा
- रुग्णालये
- औषधांची दुकाने
- शाळा, महाविद्यालये