गौतम चाबुकस्वार यांच्याकडे शिवसेना जिल्हाध्यक्षपदाची धुरा…
![Shiv Sena District President Gautam Chabukswar](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/01/Gautam-Chabukswar.jpg)
पिंपरी : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पिंपरी-चिंचवड-मावळ जिल्हाप्रमुखपदी पिंपरीचे माजी आमदार गौतम चाबुकस्वार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार चाबुकस्वार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयातून पाठवलेल्या पत्राद्वारे ही माहिती देण्यात आली आहे.
शिवसेना दोन गटात विभागली आहे. बाळासाहेबांची शिवसेना म्हणून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोन गट पडले आहेत. मावळचे खासदार श्रीरंग बारणे आणि शिरूरचे माजी खासदार शिवाजीराव अढळराव पाटील यांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे पिंपरीचे माजी आमदार गौतम चाबुकस्वार यांनी उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला.
ठाकरे यांनी गौतम चाबुकस्वार यांना सत्ता देण्यास सुरुवात केली आहे. चाबुकस्वार यांची पिंपरी-चिंचवड मावळ जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. चाबुकस्वार यांनी 2014 ते 2019 पर्यंत शिवसेनेकडून पिंपरीचे विधानसभेत प्रतिनिधित्व केले. त्यांनी पिंपरी-चिंचवड शहराचे उपमहापौर म्हणूनही काम पाहिले आहे. त्यामुळे त्यांना शहराच्या राजकारणाचे स्वरूप माहीत आहे. वकील असण्यासोबतच ते पुणे विद्यापीठात पाली भाषा शिकवतात. चारित्र्य संपन्न, स्वच्छ प्रतिमा, शांत स्वभाव. कट्टर शिवसैनिकांना एकत्र करून संघटन मजबूत करण्याचे आव्हान चाबुकस्वार यांच्यासमोर असेल. आगामी महापालिका निवडणुकीत शिवसेनेचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्यासाठी चाबुकस्वार यांना कसरत करावी लागणार आहे.