३१ डिसेंबरला पुण्यात मनसेचा “दारू नको, दूध प्या उपक्रम”
![MNSEKD's "Don't drink alcohol, drink milk initiative" in Pune on 31st December.](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/12/mns-pune-780x470.jpg)
पुणे पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे महत्त्वाची नियमावली जारी
पुणे : नव वर्षाच्या पार्श्व भूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने प्रत्येक दारूच्या दुकानासमोर दूध वाटप करण्यात येणार आहे. “मद्य सेवनाचा पाश आणि शरीर आणि आत्म्याचा एकच वेळी सत्यानाश” ही टॅग लाईन देण्यात आली असून इंग्रजी नवीन वर्षाची सुरुवात “दारू न पिता दूध प्या” या उपक्रमाच्या माध्यमातून ३१ डिसेंबर रोजी शहराच्या दारू दुकानाबाहेर हा उपक्रम राबवण्यात येणार आहे.
सोबतच, नववर्षाच्या स्वागतामध्ये कोणतेही गालबोट लागू नये यासाठी पुणे पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे काही महत्त्वाच्या नियम जारी केले आहेत. 31 डिसेंबरला पुण्यातील रेस्ट्रोबार पहाटे पाच वाजेपर्यंत सुरु राहणार आहे. त्यामुळे यंदा पुणेकरांचं नवं वर्ष धुमधडाक्यात साजरा होणार आहे. राज्य शासनाच्या आदेशानुसार पुणे, पिंपरी-चिंचवड शहरात रेस्ट्रोबार पहाटे पाच वाजेपर्यंत तर वाईन, बिअर आणि देशी मद्य विक्री दुकाने रात्री साडेदहा ऐवजी रात्री एक वाजेपर्यंत सुरु राहणार आहेत.
३१ डिसेंबरला अनेक तरुण नववर्ष साजरे करण्यासाठी रस्त्यावर उतरतात. अनेकांनी विविध रेस्टॉरंट्स आणि खाजगी रिसॉर्ट्समध्ये पार्टी आणि सेलिब्रेशनचे नियोजन केले आहे. याशिवाय पुण्यातील अनेक रस्त्यांवर तरुणांची गर्दी असते. या वर्षी 31 डिसेंबर साजरी करण्याची मोठी संधी देण्यात आली आहे. त्यामुळे दंगलखोरांवर योग्य ती कारवाई केली जाईल. शहरात ‘ड्रिंक अँड ड्राईव्ह’ करणाऱ्यांवर कारवाई होणार आहे, अशा परिस्थितीत तरुणांना वाहन चालवताना काळजी घ्यावी लागणार आहे.