माजी उद्दोगमंत्री सुभाष देसाई यांच्यावर 1000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
![Ex-industry minister Subhash Desai accused of 1000 crore corruption](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/12/imtiaz-jaleel-and-subhash-desai-780x470.jpg)
खासदार जलील यांनी बिनबुडाचा व निराधार आरोप मागे घेऊन माफी मागावी
औरंगाबाद : शिंदे-फडणवीस सरकारमधील अनेक नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत. यातच आता शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते आणि माजी मंत्री सुभाष देसाई यांच्यावरही 1000 कोटींचा भ्रष्टाचाराचा आरोप करण्यात आला आहे. देसाई यांच्यावर झालेल्या या आरोपाने राजकीय वर्तुळात चर्चांना उधान आलेलं आहे.
एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी पत्रकार परिषद घेत माजी उद्दोगमंत्री आणि औरंगाबादचे पालकमंत्री सुभाष देसाई यांच्यावर 1000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. मागील सरकारमध्ये देसाई हे उद्योगमंत्री असताना त्यांनी इंडस्ट्रियल प्लॉटचे रुपांतरण करताना अनेक विकासकांकडून कोट्यवधी रुपये घेऊन प्लॉट नियमबाह्य पद्धतीने दिले असा गंभीर आरोप खासदार जलील यांनी केला आहे. सोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात लक्ष घालून चौकशी समिती नेमावी अशी मागणी खासदार इम्तियाज जलील यांनी केली आहे.
सुभाष देसाई यांनी इंडस्ट्रियल प्लॉटचे कन्वर्जन करून अनेक बिल्डरांना कोट्यावधी रुपये घेऊन प्लॉट नियमबाह्य पद्धतीने दिले आहेत. या सर्व प्रकरणामध्ये देसाई यांचा मुलगा बिल्डरांशी संपर्क करून रेट ठरवित होता. हा घोटाळा सुमारे १००० कोटींच्या घरात आहे, असेही जलील यांनी म्हटले आहे.
खासदार जलील यांच्या आरोपनंतर देसाई यांनी इन्कार केला आहे. माझ्यावर मी उद्योगमंत्री असताना औद्योगिक जमिनींचा घोटाळा केला असा बिनबुडाचा व निराधार आरोप केला आहे. हे आरोप करताना त्यांनी कोणतीही ठोस माहिती किंवा पुरावे दिले नाहीत. माझ्या चारित्र्यावर अशा रितीने शिंतोडे उडविण्याचाच हा प्रयत्न आहे. आणि म्हणून खासदार इम्तियाज जलिल यांनी हे निराधार आरोप त्वरित मागे घेऊन जलील यांनी त्वरीत माफी मागावी, अन्यथा आपण त्यांच्यावर अब्रूनुकसानीचा दावा दाखल करू, असा इशारा देसाई यांनी दिला आहे.