भाजपा नेत्या चित्रा वाघ यांच्यावर बदनामीचा गुन्हा दाखल : मेहबुब शेख
![Twitter suspends journalists' accounts, Elon Musk's explanation on account closure](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/12/Chitra-Wagh-780x470.jpg)
पुणे : भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांच्यावर बदनामी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबुब शेख यांनी दिली. शिरुर कासार येथील पत्रकार परिषदेत चित्रा वाघ यांनी मेहबुब शेख यांच्यावर टीका केली होती. याबाबत शिरुर पोलीस न्यायालयात शेख यांनी तक्रार दाखल केली होती. न्यायालयाने चौकशी करुन साक्षी-पुरावे तपासून चौकशीअंती चित्रा वाघ यांच्या गुन्हा दाखल केला आहे, असेही मेहबूब शेख यांनी म्हटले आहे.
भारतीय संविधानाने बोलण्याचे स्वांतत्र्य दिले आहे, तसेच काय बोलावे आणि काय बोलू नये, याचीही संहिता दिली आहे. चित्रा वाघ बेताल वक्तव्य करीत आहेत. त्यांच्यावर जिल्हा न्यायालयात बदनामी केल्याप्रकरणी ५० लाख रुपयांचा दावा दाखल केला होता. या दोन्ही केस आम्ही न्यायालयात लढणार आहोत, असे मेहबुब शेख म्हटले आहे.
बलात्कार प्रकरणात मेहबुब शेख यांच्यावर आरोप करण्यात आले होते. संबंधित फिर्यादी मुलीला तक्रार करायला लावली आणि पुन्हा बदनामी केली. यामागे भाजपाचे नेते सुरेश धस आणि चित्रा वाघ आहे, असा आरोपही मेहबुब शेख यांनी केला आहे.
काय आहे प्रकरण…
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे नेते महेबुब शेख यांच्यावर अत्याचार करण्यात आल्याची तक्रार देण्यात आली होती. या प्रकरणाला नवीन वळण लागले आहे. या प्रकरणात संबंधीत महिलेने जिन्सी पोलीस ठाण्यात लग्न करण्याचे आमिष दाखवून अत्याचार करून व्हिडिओ तयार करणाऱ्या नदिमोद्दीन अलीयुद्दीन उर्फ नदीम फिटर (वय ३६) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे या व्हिडीओच्या सहाय्याने संबंधित महिलेला महेबुब शेख याच्या विरोधात खोटी तक्रार करण्यास भाग पाडल्याची माहिती फिर्यादीत देण्यात आली आहे. या फिर्यादीमध्ये आमदार सुरेश धस आणि भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्या नावांचा उल्लेख आहे.