‘मोनो’च्या मार्गात दुसऱ्याच दिवशी विघ्न
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/09/Untitled-1.jpg)
- चाकात तार अडकल्याने दोनदा खोळंबा
दहा महिन्यांनी मोनो रेल्वे सुरू झाली खरी पण दुसऱ्याच दिवशी म्हणजे रविवारी तिच्या मार्गात विघ्न आले आणि दोनवेळा तिचा खोळंबा झाला. केबलच्या आधारासाठी वापरण्यात येणारी तार चाकाखाली आल्याने वडाळ्याहून चेंबूरकडे निघालेली मोनो चेंबूर नाका येथे थांबवण्यात आली. अग्निशमन दलाने केबल कापल्यानंतर अध्र्या तासाने मोनो सुरू झाली. मात्र पुढल्या काही मिनिटांमध्ये ती पुन्हा थांबली. वडाळा डेपोकडे जाताना पुन्हा तिच्या चाकात तार अडकल्याने तिला २० ते २५ मिनिटे थांबवण्यात आले.
गेल्यावर्षी ९ नोव्हेंबरला म्हैसूर कॉलनी स्थानकाजवळ मोनोला आग लागली. त्यानंतर १० महिने मोनो सेवा पूर्णपणे बंद होती. एमएमआरडीएने अखेर शनिवारी मोनो सेवा सुरू केली. त्यामुळे चेंबूर, माहुल, वडाळा परिसरातील नागरिकांना दिलासा मिळाला. मात्र रविवारी दुपारी अडीचच्या सुमारास वडाळ्याहून चेंबूरकडे निघालेली मोनो चेंबूर नाका परिसरात अडकून पडली. चालकाने तपासणी केली असता तिच्या चाकात तार अडकल्याचे त्याच्या निदर्शनास आले. अग्निशमन दलाला बोलावण्यात आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी तार कापून मोनोचे चाक मोकळे केले. या कामाला अर्धा तास लागला. तोपर्यंत मोनोतील सुमारे ३० प्रवाशांचा खोळंबा झाला. या गाडीच्या परतीच्या प्रवासातही विघ्न आले. वडाळ्याकडे येताना चेंबूर नाका परिसरातच पुन्हा एक तार चाकात अडकली. अग्निशमन दलाने तार कापून चाक मोकळे केले.
केबलचा धोका
मोनो रेल्वेच्या चाकात अडकलेली तार इंटरनेट वाहिनीला आधार देण्यासाठी केबलचालक वापरतात. ही तार मजबूत असते. अग्शिमन दलालाही ती कापताना मेहनत करावी लागली. मोनोच्या चेंबूर ते वडाळा मार्गावर दोन्ही बाजूला लोकवस्त्या आहेत. त्यामुळे अनेक केबल आणि इंटरनेट कंपन्यांच्या तारांचे जाळे या भागात आहे. मोनो सुरू होण्यापूर्वी सर्व तारा वरून टाकण्यात आल्या होत्या. परंतु मोनो बंद असल्याने केबलचालकांनी त्या मोनो मार्गाच्या खालून टाकल्या आहेत.