महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी पुणे शहर संघाची निवड चाचणी शनिवारपासून
![Pune city team selection test for Maharashtra Kesari tournament from Saturday](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/11/Sports-Nes-780x470.jpg)
- स्व. दामोदर टकले यांच्या स्मरणात स्पर्धेचे आयोजन
पुणे । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।
भारतीय कुस्ती महासंघातर्फे नेमलेल्या अस्थायी समितीच्या मान्यतेने संस्कृती प्रतिष्ठान व माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ६५ व्या वरिष्ठ गट (गादी व माती) राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी राष्ट्रीय तालीम संघाच्या वतीने निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन छत्रपती शिवाजी स्टेडियम, मंगळवार पेठ येथे २६ व २७ नोव्हेंबर २०२२ रोजी घेण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रीय तालीम संघाचे सरचिटणीस शिवाजीराव बुचडे यांनी दिली.
ही निवड चाचणी स्पर्धा राष्ट्रीय तालीम संघाचे विश्वस्त – अध्यक्ष स्व. वस्ताद दामोदर लक्ष्मण टकले यांच्या स्मरणार्थ घेण्यात येणार असल्याची माहिती स्पर्धा आयोजक अविनाश टकले यांनी दिली.
ही निवड चाचणी गादी आणि माती या दोन्ही विभागात होणार असून माती विभागात ५७ किलो, ६१ किलो, ६५ किलो, ७० किलो, ७४ किलो, ७९ किलो, ८६ किलो, ९२ किलो, ९७ किलो, ८६ किलो ते १२५ (महाराष्ट्र केसरी गट) किलो वजनी गटांमध्ये, तर गादी विभागात ५७ किलो, ६१ किलो, ६५ किलो, ७० किलो, ७४ किलो, ७९ किलो, ८६ किलो, ९२ किलो, ९७ किलो व ८६ किलो ते १२५ किलो (महाराष्ट्र केसरी गट) अशा वजनी गटात ही निवड चाचणी होणार आहे.
या निवड चाचणीमध्ये केवळ पुणे शहरातील खेळाडूंचा समावेश राहणार आहे. २६ नोव्हेंबर रोजी सकाळी नऊ ते १२ या वेळेत खेळाडूंची वजने केली जाणार असून दुपारी ४ पासून निवड चाचणी स्पर्धेला सुरुवात होणार आहे. निवड चाचणीमध्ये सहभागी होण्यासाठी मल्लांनी ३ फोटो, आधारकार्डची मुळ प्रत व झेरॉक्स घेवून येणे बंधनकारक आहे. अधिक माहितीसाठी गणेश दांगट, मधुकर फडतरे, जयसिंगअण्णा पवार, योगेश पवार, ज्ञानेश्वर मांगडे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन राष्ट्रीय तालीम संघाचे सरचिटणीस शिवाजीराव बुचडे यांनी केले आहे.