नवले पूल अपघात प्रकरणात दोन ट्रकचालक अटकेत
![two-truck-drivers-arrested-in-navle-bridge-accident-case](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/11/Pune-Navle-Bridge-Accident-1-780x470.jpg)
मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर नवले पूल परिसरात रविवारी रात्री झालेल्या अपघात प्रकरणात सिंहगड रस्ता पोलिसांनी दोन ट्रकचालकांना अटक केली. अपघातात ४८ वाहनांचे नुकसान झाले होते. पसार झालेल्या एका ट्रकचालकाला चाकण परिसरातून अटक करण्यात आली.
मणीराम छोटेलाल यादव (वय २३, रा. मध्यप्रदेश), अमन राजबहादूरसिंग यादव (वय २४, रा. उत्तर प्रदेश) अशी अटक करण्यात आलेल्या ट्रकचालकांची नावे आहेत. बाह्यवळण मार्गावर नवले पूल परिसरात रविवारी रात्री दोन वेगवेगळे अपघात झाले. भरधाव ट्रकने रविवारी रात्री नऊच्या सुमारास वाहनांना धडक दिली. अपघातानंतर ट्रकचालक मणीराम छोटेलाल यादव पसार झाला होता. कात्रज बोगद्याच्या पुढे तीव्र उतारावर यादव याने वाहन न्यूट्रल स्थितीत चालविले होते. या अपघातात तेरा जण जखमी झाले. अपघातानंतर ट्रक ताब्यात घेण्यात आला होता. तांत्रिक तपासात मणीराम यादव चाकण परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर सिंहगड पोलिसांनी त्याला चाकण परिसरातून अटक केली. याबाबत सहायक पोलिस निरीक्षक प्रवीण जाधव यांनी फिर्याद दिली आहे.
रविवारी रात्री झालेल्या दुसऱ्या अपघातात भरधाव ट्रकने सात वाहनांना धडक दिली. या अपघातात वाहनांचे नुकसान झाले. ट्रकचालक अमन यादव याला अपघाताच्या ठिकाणापासून काही अंतरावर ताब्यात घेण्यात आले.