डोंबिवलीत विहिरीत आढळला ‘सीए’च्या विद्यार्थ्याचा मृतदेह
डोंबिवली: डोंबिवली जवळील २७ गाव हद्दीतील मानपाडा-उंबार्ली गाव रस्त्यावर एका पडिक विहिरीत सनदी लेखापाल अभ्यासक्रमाच्या अंतीम परीक्षेची तयार करत असलेल्या विद्यार्थ्यांचा मृतदेह आढळून आला आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे. या तरुणाने आत्महत्या केली की काही घातपात या मागे आहे याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. विकास पासवान (२५) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. विकास आपल्या कुटुंबीयांसह मानपाडा गाव हद्दीत राहतो. तो सनदी लेखापाल अभ्यासक्रमाच्या शेवटच्या वर्षाचा अभ्यास करत होता. नियमित अभ्यास करुन तो वडिलांच्या उपहारगृह व्यवसायात मदत करत होता. तो तणावात किंवा चिंताग्रस्त असल्याचे कुटुंबीयांना कधीही आढळून आले नाही.
बुधवारी दुपारी विकास घरातून वडिलांच्या दुकानात आला. त्याने वडिलांकडून तीस रुपये मागून घेतले. तो बाहेर जाऊन काही खाऊन घरी जाईल असे वडिलांना वाटले. रात्र झाली तरी विकास घरी येत नाही म्हणून कुटुंबीयांनी त्याच्या मित्रांना विचारणा केली. परिसरात शोध घेतला तरी तो आढळून आला नाही. याप्रकरणी कुटुंबीयांना मानपाडा पोलीस ठाण्यात तो बेपत्ता असल्याची तक्रार केली. दोन दिवसांपासून कुटुंबीय, पोलीस त्याचा शोध घेत होते. शुक्रवारी दुपारी त्याचा मानपाडा-उंबार्ली रस्ता परिसरात शोध घेत असताना विकासचा मृतदेह या भागातील एका पडिक विहिरीत आढळून आला. विकासच्या या कृत्याने पासवान कुटुंबीय हादरुन गेले. अभ्यासाच्या तणावातून की यामागे काही घातपात आहे याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे.