लम्पी बळींची संख्या चौदा हजारांवर; भरपाईची प्रक्रिया संथ
![Lumpy victims number at fourteen thousand; Compensation process is slow](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/11/Lumpy-disease-PTI-1200-780x470.jpg)
पुणे : लम्पी रोगामुळे राज्यात आजअखेर १३,७७६ जनावरांचा मृत्यू झाला आहे. लम्पीमुळे जनावरांचा मृत्यू होऊन अडचणीत आलेल्या पशुपालकांना आर्थिक मदतीची घोषणा राज्य सरकारकडून करण्यात आली असली, तरीही ही मदत देण्याची प्रक्रिया अत्यंत संथ गतीने सुरू आहे. आजवर केवळ चार हजार पशुपालकांना १०. २३ कोटींची मदत देण्यात आली आहे.
पशुसंवर्धन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात एकूण ३३ जिल्ह्यांत लम्पीचा प्रादुर्भाव झाला आहे. एकूण २,१०,०८७ जनावरांना लम्पीची बाधा झाली आहे. त्यापैकी १,४२,०१६ पशुधन उपचारानंतर बरे झाले आहे, तर सोमवारअखेर (सात नोव्हेंबरर) १३,७७६ जनावरांचा लम्पीमुळे मृत्यू झाला आहे. आजपर्यंत लम्पी चर्मरोगामुळे मृत्युमुखी पडलेल्या गोवंशीय पशुधनाच्या ३९६३ पशुपालकांच्या खात्यांवर नुकसान भरपाई पोटी १०.२३ कोटी रुपयांची रक्कम जमा करण्यात आली आहे.
राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये आजअखेर एकूण १४४.१२ लाख लस मात्रा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यामधून एकूण १३६.९४ लाख पशुधनास मोफत लसीकरण करण्यात आले आहे. जळगाव, अहमदनगर, धुळे, अकोला, औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, वाशिम, जालना, हिंगोली, नंदुरबार आणि मुंबई उपनगर या जिल्ह्यांमधील लसीकरण पूर्ण झाले आहे. खासगी संस्था, सहकारी दूध संघ आणि वैयक्तिक पशुपालकांनी करून घेतलेल्या लसीकरणाच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात सुमारे ९७.८७ टक्के गोवंशीय पशुधनाचे लसीकरण पूर्ण झाले आहे.
नमुने ‘एनआयव्ही’कडे
लम्पी चर्म रोगाच्या विषाणूच्या जनुकीय परीक्षणांतर्गत जिनोम क्रमवारिता तपासणीसाठी आवश्यक नमुने राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था, पुणे (एनआयव्ही) येथे पाठविण्यात आले आहेत. या तपासणीमुळे विषाणूमधील जनुकीय स्तरावरील बदलांबाबतची माहिती अपेक्षित आहे. तसेच लसीमुळे निर्माण होणाऱ्या प्रतिकारक शक्तीचे मूल्यमापन करण्यासाठी आवश्यक नमुने बेंगलुरु येथील राष्ट्रीय रोग परिस्थिती विज्ञान व रोग माहिती संस्थेकडे पाठविण्यात येत आहेत.
लम्पी चर्म रोगाची साथ आता पूर्णपणे आटोक्यात आली आहे. नव्याने संसर्ग होण्याचे प्रमाण खूपच कमी झाले आहे. गायींच्या कुठल्याही वयाच्या वासरांना, तसेच अद्यापही लसीकरण न झालेल्या गोवंशीय पशुधनास तातडीने लसीकरण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
– सचिन्द्र प्रताप सिंह, आयुक्त, पशुसंवर्धन विभाग