शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतरिम निकाल जाहीर; पाचवीचे २३.९० टक्के, आठवीचे १२.५४ टक्के विद्यार्थी पात्र
![Interim Result of Scholarship Exam Announced; 23.90 percent students of class V, 12.54 percent of students of class VIII are eligible](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/11/New-Project-52-1-1-780x470.jpg)
पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत पाचवी आणि आठवी शिष्यवृती परीक्षेचा अंतरिम निकाल जाहीर करण्यात आला. त्यात पाचवीचे २३.९० टक्के तर आठवीचे १२.५४ टक्के विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले. शिष्यवृत्ती परीक्षा जुलैमध्ये घेण्यात आली होती. पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी ४ लाख १८ हजार ५५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. ३ लाख ८२ हजार ६९७ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. त्यापैकी ९१ हजार ४७० विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले. आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या ३ लाख ३ हजार ८०९ विद्यार्थ्यांपैकी २ लाख ७९ हजार ४६६ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. त्यापैकी ३५ हजार ३४ विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरल्याची माहिती परीक्षा परिषदेने दिली. तसेच शासकीय, आदिवासी, विमुक्त जाती व भटक्या जमाती विद्यानिकेतन प्रवेश परीक्षेचाही अंतरिम निकाल जाहीर करण्यात आला.
शाळांना विद्यार्थ्यांचा निकाल आपल्या लॉगिनमधून, तर विद्यार्थी-पालकांना संकेतस्थळावर निकाल पाहता येईल. विद्यार्थ्यांना गुणपडताळणी करून घेण्यासाठी, तसेच विद्यार्थ्यांचे नाव, आडनाव, वडिलांचे नाव, आईचे नाव, शहरी किंवा ग्रामीण, अभ्यासक्रम इत्यादीमध्ये दुरुस्तीसाठी संबंधित शाळेच्या लॉगीनमध्ये १७ नोव्हेंबरपर्यंत ऑनलाइन अर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहेत.