पुण्यात हंगामात दुसऱ्यांदा नीचांकी तापमान ; उन्हाचा चटका वाढण्याची शक्यता
![Second lowest temperature in season in Pune; Chances of heatstroke increasing](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/11/temperature-1-780x470.jpg)
पुणे शहरात शुक्रवारी (३ नोव्हेंबर) एकाच आठवड्यात दुसऱ्यांदा राज्यातील नीचांकी किमान तापमानाची नोंद झाली. शिवाजीनगर केंद्रावर शुक्रवारी १३.१ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. शहरात दिवसाच्या कमाल तापमानाचा पारा मात्र काही प्रमाणात वाढला असून, ३१.७ अंश सेल्सिअस नोंदविला गेला. शहरात पुढील तीन चे चार दिवस दिवसा आणि रात्रीच्या दोन्ही तापमानात किंचित वाढ होण्याची शक्यता पुणे वेधशळाने व्यक्त केली आहे.
शहरात ऑक्टोबरच्या २३ तारखेपासून तापमानाच एकदमच मोठी घट झाली. त्या दिवसापासून रात्रीच्या किमान तापमानाचा पारा सरासरीखाली आला असून, तो अद्यापही दरदिवशी सराससराखालीच नोंदविला जात आहे. आठवड्यापासून शहरातील किमान तापमान सरासरीच्या तुलनेत २ ते ३ अंशांनी कमी नोंदिवले जात आहे. सरासरी १३ ते १४ अंशांच्या आसपास किमान तापमान नोंदिवले जात आहे. ३० ऑक्टोबरला पुण्यात राज्यातील नीचांकी तापमानासह शहरातील यंदाच्या हंगामातीलही नीचांकी १२.६ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली होती. ३१ ऑक्टोबरला १३.४ अंश, १ नोव्हेंबरला १३.३ अंश किमान तापमान नोंदविले गेले. मात्र, २ नोव्हेंबरला त्यात वाढ होऊन किमान तापमानाचा पारा १५.१ अंशांपर्यंत वाढला. गुरुवारी त्यात पुन्हा दोन अंशांनी घट होऊन राज्यातील नीचांकी १३.१ अंश किमान तापमानाची नोंद झाली.
शहरात दिवसाच्या कमाल तापमानाचा पारा चार ते पाच दिवसांपूर्वी ३० अंशांच्या खाली होता. मात्र, सध्या तो ३० अंशांवर जातो आहे. शुक्रवारी शहरात ३१.७ अंश कमाल तापमानाची नोंद झाली. सरासरीच्या तुलनेत हे तापमान अधिक असल्याने उन्हाचा हलका चटका जाणवतो आहे. पुणे वेधशाळेने दिलेल्या अंदाजानुसार रात्रीच्या किमान तापमानात पुढील तीन-चार दिवस किंचित वाढ होणार असून, दिवसाचे कमाल तापमानही काही प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. दिवसाच्या तापमानाचा पारा ३२ ते ३३ अंशांवर जाणार असल्याने उन्हाचा चटका काही प्रमाणात वाढणार आहे.