कोंढव्यात भंगाराच्या गोदामातील आगीत एक कामगार जखमी
कोंढव्याच्या टिळेकरनगर येथील भंगाराच्या गोदामाला गुरुवारी संध्याकाळी भीषण आग लागली. त्यात एक कामगार जखमी झाला आहे.तुकाराम साठे (वय ६५) असे आगीत जखमी झालेल्या कामगाराचे नाव आहे. शहरात गुरुवारी दिवसभरात गोदामाला लागलेली ही दुसरी आग ठरली. सकाळी नगर रस्त्यावरील वडगाव शेरी परिसरात एका भंगार मालाच्या गोदामाला आग लागली होती.
गुरुवारी संध्याकाळी पावणे सात वाजण्याच्या सुमारास टिळेकरनगरजवळ असलेल्या एका भंगाराच्या गोदामाला आग लागल्याच्या घटनेची माहिती अग्निशमन दलाला मिळाल्यानंतर अग्निशमन दलाच्या पाच गाड्यांनी घटनास्थळी धाव घेतली. या वेळी आगीतून बारा एलपीजी सिलिंडर बाहेर काढण्यात आले. आगीत अडकल्याने गोदामामध्ये काम करणारा एक कामगार जखमी झाला आहे. रात्री पावणे आठ वाजण्याच्या सुमारास ही आग आटोक्यात आली. रात्री उशिरापर्यंत अग्निशमन दलाकडून पाण्याचा मारा सुरूच ठेवण्यात आला होता. दिवसभरात गोदामाला लागलेली ही दुसरी आग आहे. सकाळी वडगाव शेरी भागातही भंगाराच्या गोदामाला आग लागून साहित्य जळाले.